कायमस्वरुपी पीडीओ नसल्याने नागरिकांचे हाल : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुकसारख्या ए ग्रेड ग्राम पंचायतीचा कारभार गेल्या महिन्याभरापासून पीडीओविनाच सुरू असल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांची गैरसोय होत आहे. नागरिकांना पीडीओविना हेलपाटे मारावे लागत आहेत. संबंधीत खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन सदर पंचायतीस कायमस्वरूपी पीडीओची नेमणूक करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात येत आहे. कंग्राळी बुद्रुक व गौंडवाड या दोन्ही गावांची मिळून सदर ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतमध्ये कंग्राळी बुद्रुकमध्ये 11 वॉर्ड तर गौंडवाडमध्ये 2 वॉर्ड असे एकूण 13 वॉर्ड आहेत. सदस्य संख्यासुद्धा 34 आहे. परंतु एवढा मोठा विस्तार असलेल्या ग्रामपंचायतीला शासनाकडून कायमस्वरूपी पीडीओ मिळत नाही हे गावचे दुर्दैव आहे. पूर्वी सदर पंचायतमध्ये जी. आय. बर्गी म्हणून पीडीओ होते. त्यांची आता बदली होऊन महिना झाल्याचे नागरिकांतून सांगण्यात येत आहे. ते पीडीओसुद्धा बरेच दिवस सांबरा व कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत या दोन्ही पंचायतींचा कार्यभार सांभाळत होते. नंतर कंग्राळी खुर्द या ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळत कंग्राळी बुद्रुकचा कार्यभारही सांभाळला. यामुळे त्यावेळीही या गावाला दोन दिवस तिकडे व दोन दिवस इकडे यातच त्यांचा आठवडा जात होता. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी कायमस्वरूपी पीडीओ संदर्भात ता. पं. ला निवेदन सुद्धा दिले होते. परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. गेले 8-10 दिवस झाले गुरव म्हणून प्रभारी पीडीओ येत आहेत. हे सुद्धा कंग्राळी खुर्द व कंग्राळी बुद्रुक या दोन्ही ग्रामपंचायतींचा प्रभारी पीडीओ म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे.
कायमस्वरूपी पीडीओची मागणी
कंग्राळी बुद्रुकसारख्या मोठ्या पंचायतीला कायमस्वरूपी पीडीओची नितांत गरज आहे. परंतु शासनाकडे पीडीओ पदाची संख्याच कमी केली आहे की काय माहीत नाही. परंतु यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामांची मात्र कुचंबणा होत आहे. तेव्हा संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे त्वरित लक्ष देऊन कायमस्वरूपी पीडीओची नेमणूक करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी करण्यात येत आहे.









