वर्ल्डकप इतिहासातील ऑस्ट्रेलियाचा सर्वात मोठा विजय : नेदरलँड्सचा अवघ्या 90 धावांत खुर्दा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये बुधवारी अरुण जेटली स्टेडियमवर ऑस्ट्रेलियाने वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा असा 309 धावांनी विजय मिळवला. सुरुवातीला डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेलच्या तुफानी शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्ससमोर 400 धावांचे लक्ष्य ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा डाव 21 षटकांत अवघ्या 90 धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियाचा हा तिसरा विजय असून गुणतालिकेत ते 6 गुणासह चौथ्या स्थानावर विराजमान आहेत. 40 चेंडूत वेगवान शतक झळकावणाऱ्या ग्लेन मॅक्सवेलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता, त्यांचा पुढील सामना न्यूझीलंडविरुद्ध होईल. विशेष म्हणजे, या विजयाने त्यांचा नेट रनरेट खूप मजबूत झाला आहे.
ऑस्ट्रेलियाचा विक्रमी विजय
विजयासाठी दिलेल्या 400 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन गोलंदाजासमोर नेदरलँड्सच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकली. सलामीवीर विक्रमजीत सिंगने सर्वाधिक 25 धावा केल्या तर तेजा निदामारुने 14, सॅब्रॅडने 11 तर कॉलिन एकरमनने 10 धावा फटकावल्या. इतर फलंदाजांनी दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाकडून फिरकीपटू अॅडम झाम्पाने शानदार गोलंदाजी करताना अवघ्या 8 धावांत 4 गडी बाद केले तर मिचेल मार्शने 2 गड्यांना तंबूत पाठवले. याशिवाय, हॅजलवूड, पॅट कमिन्स व स्टार्कने एकेक गडी बाद केला.
फलंदाजी करणाऱ्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर मिचेल मार्श अवघ्या 9 धावा काढून तंबूत परतला. त्याला व्हॅन बीकने बाद केले. यानंतर डेव्हिड वॉर्नर व स्टीव्ह स्मिथ यांनी दुसऱ्या गड्यासाठी 132 धावांची भागीदारी करत संघाचे दीडशतक फलकावर लावले. या जोडीने एकेरी दुहेरी धावांवर भर देत धावफलक हलता ठेवला. स्मिथने 68 चेंडूत 9 चौकार व 1 षटकारासह 71 धावा फटकावल्या. ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना स्मिथला आर्यन दत्तने बाद केले. यानंतर वॉर्नरने लाबुशेनला सोबतीला घेत संघाचे द्विशतक फलकावर लावले. दरम्यान, लाबुशेनने आक्रमक खेळताना 47 चेंडूत 7 चौकार व 2 षटकारासह 61 धावा केल्या. उंच षटकार मारण्याच्या प्रयत्नात तो 61 धावांवर बाद झाला. जोस इंग्लिशही फार काळ मैदानावर टिकला नाही. त्याला 14 धावांवर डी लीडने आऊट केले.
वॉर्नर, मॅक्सवेलची शतके

लाबुशेन, जोस इंग्लिश बाद झाल्यानंतर वॉर्नरने मात्र आपला धडाका कायम ठेवताना यंदाच्या वर्ल्डकपमधील दुसरे तर कारकिर्दीतील 22 वे शतक झळकावले. त्याने 93 चेंडूचा सामना करताना 11 चौकार व 3 षटकारासह 104 धावा केल्या. वॉर्नरने सुरुवातीला स्मिथ नंतर लाबुशेनला सोबतीला घेत महत्वपूर्ण भागीदारी साकारली. वॉर्नर बाद झाल्यानंतर मात्र सहाव्या क्रमाकांवर फलंदाजीला आलेल्या मॅक्सवेलने नेदरलँडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. मॅक्सवेलने विश्वचषक स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात वेगवान शतक यावेळी नोंदवले. त्याने अवघ्या 40 चेंडूत शतकी खेळी साकारली. मॅक्सवेलच्या या तुफानी खेळीमुळे ऑसी संघाने निर्धारित 50 षटकांत 8 बाद 399 धावांचा डोंगर उभा केला. त्याने 44 चेंडूत 9 चौकार व 8 षटकारासह 106 धावांचे योगदान दिले. त्याला पॅट कमिन्सने 2 चौकारासह 12 धावा करत चांगली साथ दिली. विशेष म्हणजे, मॅक्सवेल व कमिन्सने सातव्या गड्यासाठी 103 धावांची भागीदारी करत संघाला चारशेचा टप्पा गाठून दिला. नेदरलँड्सकडून लोगान व्हॅन बीकने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर, बास डी लीडेने दोन विकेट घेतल्या. याशिवाय, आर्यन दत्तच्या खात्यात एक विकेट जमा झाली.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया 50 षटकांत 8 बाद 399 (डेव्हिड वॉर्नर 104, स्टिव्ह स्मिथ 71, लाबुशेन 62, ग्लेन मॅक्सवेल 106, पॅट कमिन्स नाबाद 12, व्हॅन बीक 74 धावांत 4 बळी, डी लीडे 115 धावांत 2 बळी).
नेदरलँड्स 21 षटकांत सर्वबाद 90 (विक्रमजीत सिंग 25, तेजा 14, सॅब्रँड 11, स्कॉट एडवर्ड 12, झम्पा 8 धावांत 4 बळी, मार्श 19 धावांत 2 बळी).
मॅक्सवेलचा बिग शो, वर्ल्डकपमध्ये झळकावले सर्वात वेगवान शतक
ग्लेन मॅक्सवेलने नेदरलँड्सविरुद्ध 40 चेंडूत शतक झळकावून वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. याआधी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एडन मार्करमच्या नावे होता. त्याने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये 7 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेविरुद्ध 49 चेंडूत 106 धावांची शतकी खेळी केली होती. पण अवघ्या 19 दिवसांत मॅक्सवेलने या विक्रमाला मागे टाकले. मॅक्सवेलने 44 चेंडूंत 9 चौकार व 8 षटकारांसह 106 धावांची खेळी साकारली.
वर्ल्डकपमधील सर्वात वेगवान शतके
- मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) 40 चेंडूत वि. नेदरलँड्स 2023 – दिल्ली
- एडन मार्करम (दक्षिण आफ्रिका) 49 चेंडूत वि. श्रीलंका 2023- दिल्ली
- केव्हिन ओब्रायन (आयर्लंड) 50 चेंडूत वि. इंग्लंड 2011 – बेंगळूर
- मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) 51 चेंडूत वि श्रीलंका 2015 – सिडनी
- एबी डीव्हिलियर्स (द. आफ्रिका) 52 चेंडूत वि. वेस्ट इंडिज 2015- सिडनी
वॉर्नरचा शतकी तडाखा, तेंडुलकरच्या विक्रमाशी केली बरोबरी
नेदरलँडविरुद्ध डेव्हिड वॉर्नरने आपले 22 वे वनडे शतक पूर्ण केले. या शतकी खेळीसह वॉर्नरने अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. सचिन तेंडुलकरने विश्वचषकात आपल्या कारकिर्दीत एकूण 6 शतके झळकावली होती. तर डेव्हिड वॉर्नरने या विश्वचषकात आपले दुसरे शतक तर विश्वचषकाच्या इतिहासातील सहावे शतक झळकावत सचिनच्या विक्रमाशी बरोबरी साधली. या बाबतीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर वर्ल्डकपमधील सर्वाधिक सात शतके आहेत.
वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारे फलंदाज
रोहित शर्मा – 7
सचिन तेंडुलकर – 6
डेव्हिड वॉर्नर – 6
कुमार संगकारा – 5
रिकी पाँटिंग – 5
कांगारुंचा वर्ल्डकप इतिहासातील मोठा विजय
क्रिकेट विश्वचषकाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नेदरलँड्सचा 309 धावांनी धुव्वा उडवला आहे. वर्ल्डकपमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय आहे. या विजयासह त्यांनी वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावांनी विजय मिळविण्याचा आपल्याच नावे असलेला विक्रम मोडित काढला. ऑस्ट्रेलियाने 2015 साली झालेल्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानचा पर्थ येथे 275 धावांनी पराभव केला होता.
वर्ल्डकपमधील आतापर्यंतचे मोठे विजय
- ऑस्ट्रेलिया 309 धावांनी विजयी वि नेदरलँड्स – 2023
- ऑस्ट्रेलिया 275 धावांनी विजयी वि अफगाणिस्तान – 2015
3. द.आफ्रिका 257 धावांनी विजयी वि विंडीज – 2015.









