वृत्तसंस्था/विशाखापट्टण
कर्णधार अॅलिसा हिलीचे नाबाद शतक तसेच लिचफिल्डच्या नाबाद 84 धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने गुरूवारी येथे खेळविण्यात आलेल्या आयसीसी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात बांगलादेशचा 10 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या सामन्यातील विजयामुळे ऑस्ट्रेलियन महिला संघाने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले. 10 षटकांत 18 धावा देत 2 गडी बाद करणारी अलाना किंग ‘सामनावीर’ची मानकरी ठरली. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 50 षटकात 9 बाद 198 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने 24.5 षटकात बिनबाद 202 धावा जमवित हा सामना 25.1 षटके बाकी ठेवून 10 गड्यांनी एकतर्फी जिंकला.
बांगलादेशच्या डावात शोभना मोस्तारीने 80 चेंडूत 9 चौकारांसह नाबाद 66, रुबिया हैदरने 59 चेंडूत 8 चौकारांसह 44, शर्मिन अख्तरने 3 चौकारांसह 19, कर्णधार निगार सुलतानाने 12 धावा जमविल्या. बांगलादेशच्या इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. बांगलादेशला मात्र ऑस्ट्रेलियाकडून 28 अवांतर धावा मिळाल्या. ऑस्ट्रेलियातर्फे गार्डनर, सदरलँड, अलाना किंग आणि वेअरहॅम यांनी प्रत्येकी 2 गडी तर मेगन शूटने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार हिली आणि लिचफिल्ड सलामीच्या गड्यासाठी 24.5 षटकात अभेद्य 202 धावांची द्विशतकी भागिदारी नोंदवित विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. या जोडीने शतकी भागिदारी 83 चेंडूत तर द्विशतकी भागिदारी 149 चेंडूत नोंदविली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश 50 षटकात 9 बाद 198 (शोभना मोस्तारी नाबाद 66, रुबिया हैदर 44, शर्मिन अख्तर 19, निगार सुलताना 12, अवांतर 28, गार्डनर, सदरलँड, अलाना किंग आणि वेअरहॅम प्रत्येकी 2, शूट 1-11), ऑस्ट्रेलिया 24.5 षटकात बिनबाद 202 (अॅलिसा हिली नाबाद 113, लिचफिल्ड नाबाद 84, अवांतर 5).









