स्टीव्ह स्मिथची चौथ्या स्थानी घसरण, ट्रेव्हिस हेड दुसऱ्या तर बाबर आझम तिसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था/लंडन
अॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर आयसीसीने ताजी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. यानुसार टॉप-5 स्थानांमध्ये मोठा बदल झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रेव्हिस हेडने आपल्याच संघातील अनुभवी खेळाडू स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, हेडची त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी आहे. न्यूझीलंडचा केन विल्यम्सन अव्वलस्थानी कायम आहे.
इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात शानदार कामगिरी करत हेडने दोन स्थानांनी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाच्या या 29 वर्षीय खेळाडूने अॅशेसमध्ये 44.33 च्या सरासरीने 266 धावा केल्या आहे. मागील काही काळापासून दुखापतीने बाहेर असलेला न्यूझीलंडचा अव्वल फलंदाज केन विल्यम्सन 883 गुणासह पहिल्या स्थानी कायम आहे. गेल्या सुमारे चार महिन्यांपासून तो कसोटी खेळला नाही, पण त्यानंतरही त्याने पहिल्या क्रमांकाची खुर्ची काबीज केली होती, जी अजूनही अबाधित आहे. याशिवाय, अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटीतील खराब कामगिरीचा स्मिथला फटका बसला आहे. स्मिथने या सामन्यातील पहिल्या डावात 22, तर दुसऱ्या डावात 2 धावा केल्या. स्मिथ ताज्या कसोटी क्रमवारीत 855 गुणांसह चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याला दोन स्थानांचे नुकसान झाले आहे.याशिवाय, ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लाबुशेनचेही नुकसान झाले आहे. लॅबुशेन 849 गुणांसह तो पाचव्या क्रमांकावर घसरला आहे. याआधी तो तिसऱ्या क्रमांकावर होता. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम पुन्हा एकदा तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. मागच्या वेळी तो पहिल्या पाचमधून बाहेर पडला होता. सध्या बाबरचे 862 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजा 824 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
टॉप-10 मध्ये केवळ एकच भारतीय
भारताचा ऋषभ पंत (758 गुण) केवळ एकटा आहे, ज्याने पहिल्या 10 फलंदाजांमध्ये स्थान कायम ठेवले आहे. विराट कोहली (700) दोन स्थानांच्या नुकसानासह 14 व्या क्रमांकावर आला आहे. तर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (729 गुण) 13 व्या क्रमांकावर आहे. असे असले तरी, वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून विराट आणि रोहित कसोटी क्रमवारीत सुधारणा करु शकतात. गोलंदाजी क्रमवारीत भारताचा फिरकीपटू आर. अश्विन 860 गुणासह पहिल्या स्थानी कायम असून जसप्रीत बुमराह नवव्या तर रविंद्र जडेजा दहाव्या स्थानी आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजाने पहिले स्थान कायम राखले असून आर.अश्विन दुसऱ्या तर अक्षर पटेल पाचव्या स्थानावर आहे.
आयसीसी फलंदाजी क्रमवारी –
- केन विल्यमसन – 883 गुण
- ट्रेव्हिस हेड – 874 गुण
- बाबर आझम – 862 गुण
- स्टीव्ह स्मिथ – 855 गुण
- मार्नस लॅबुशेन – 849 गुण
- जो रुट – 842 गुण
- उस्मान ख्वाजा – 824 गुण
- डॅरिल मिशेल – 792 गुण
- दिमुथ करुणारत्ने – 780 गुण
- ऋषभ पंत – 758 गुण









