वृत्तसंस्था/ दुबई
न्यूझीलंडचा फलंदाज केन विल्यम्सनने कसोटी फलंदाजांच्या ताज्या मानांकनात अग्रस्थानावर झेप घेतली असल्याचे आयसीसीने जाहीर केले. ‘लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीनंतर ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथने जोरदार प्रगती करीत अग्रस्थानाकडे मजल मारली आहे. मात्र विल्यम्सनने इंग्लंडच्या जो रूटला मागे सारत पहिले स्थान पटकावले आहे,’ असे आयसीसीने म्हटले आहे. दुसऱ्या कसोटीत स्मिथने 110 व 34 धावा जमविल्यानंतर क्रमवारीत चार स्थानांची प्रगती करीत दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. यापूर्वी जुन 2021 मध्ये त्याने अग्रस्थान मिळविले होते. रूटची मात्र पाचव्या स्थानावर घसरण झाली असल्याने विल्यम्सनला टॉपचे स्थान मिळाले.
पहिल्या स्थानासाठी जोरदार चुरस लागणार असून स्मिथ विल्यम्सनपेक्षा केवळ एका गुणाने मागे आहे. विल्यम्सनचे 883 गुण झाले आहेत. मार्नस लाबुशेन तिसऱ्या स्थानावर असून त्याचे 873 गुण आहेत. त्याचाच संघसहकारी टॅव्हिस हेड केवळ एका गुणाने त्याच्यापेक्षा मागे आहे. इंग्लंडचा फलंदाज बेन डकेटने एकदम 24 स्थानांची झेप घेत कारकिर्दीत पहिल्यांदाच टॉप 20 मध्ये स्थान मिळविले आहे. त्याचा कर्णधार बेन स्टोक्सनेही 9 स्थानांची प्रगती करीत 23 वे स्थान मिळविले आहे.
गोलंदाजांत पॅट कमिन्सने दुसऱ्या स्थानावर मजल मारली आहे तर त्याचा सहकारी स्टार्कने दोन स्थानांची बढती मिळवित 14 वे स्थान मिळविले. फलंदाजांत वॉर्नरने चार स्थाने पुढे सरकत 26 वे स्थान घेतले आहे.









