वर्ल्डकपसाठी किवीज संघ जाहीर : ट्रेंट बोल्टचेही पुनरागमन, डेव्हॉन कॉनवेलाही संधी
वृत्तसंस्था / ऑकलंड
आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यास फारच कमी वेळ शिल्लक आहे. सोमवारी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने वर्ल्डकपसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन आणि टॉम लॅथमसह 15 खेळाडूंचा वर्ल्डकप संघात समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, दुखापतग्रस्त केन विल्यम्सनचा संघात समावेश करण्यात आला असून तो वर्ल्डकपमध्ये किवी संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएलमध्ये झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून तो अजूनही सावरलेला नाही. विल्यम्सन किती दिवसात तंदुरुस्त होईल हे स्पष्ट नाही.
2019 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारा अष्टपैलू जिमी नीशमलाही 15 सदस्यीय विश्वचषक संघात स्थान मिळाले आहे. नीशमशिवाय ट्रेंट बोल्ट देखील 2019 वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळला होता आणि केंद्रीय करार यादीत नसतानाही, या दोघांनाही वर्ल्डकप संघात स्थान मिळाले आहे. याशिवाय मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डेव्हॉन कॉनवे, विल यंग यांचीही संघात वर्णी लागली असून त्यांच्या कामगिरीकडे लक्ष्य असेल. तसेच विश्वचषकासाठी न्यूझीलंडने संघात तीन फिरकीपटूंचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे तीन फिरकीपटूंपैकी दोन फिरकीपटू भारतीय वंशाचे आहेत. ईश सोधी आणि रचिन रवींद्र हे किवीज संघाचा भाग असतील. सोधी हा पंजाबमधील लुधियाना येथील आहे. रचिनचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला आहे पण त्याचे वडील भारतातील आहेत. हे दोन्ही फिरकीपटू आगामी विश्वचषकात किवी संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
विल्यम्सनचे पुनरागमन
कर्णधार आणि अनुभवी फलंदाज केन विल्यम्सन आयपीएलच्या पहिल्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे मार्च महिन्यापासून ते आत्तापर्यंत म्हणजे सप्टेंबरपर्यंत तो त्यातून सावरत होता. तो या दुखापतीमुळे विश्वचषक संघाचा भाग नसेल असेही म्हटले जात होते. पण किवीज बोर्डाने आगामी वर्ल्डकपसाठी त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. अर्थात, विल्यम्सन पूर्ण फिट नसला तरी पुढील काही दिवसात तो पूर्णपणे तंदुरुस्त होईल, असे किवीज बोर्डाने सांगितले आहे.
अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा
वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड बोर्डाने संघाची घोषणा केली. पण ही घोषणा अगदी हटके पद्धतीने करण्यात आली आहे. साधारणपणे संघाची घोषणा करताना पत्रकार परिषद घेतली जाते. या पत्रकार परिषदेत संघाचा कर्णधार आणि चीफ सिलेक्टर संघाची घोषणा करतात. पण न्यूझीलंड संघाने चक्क खेळाडूंच्या कुटुंबाचाच नाव घोषित करण्यासाठी वापर केला. न्यूझीलंड बोर्डाने एक व्हिडिओ बनवला असून या व्हिडिओत खेळाडूंच्या पत्नी आणि मुले आपल्या नवऱ्याचे किंवा वडिलांची जर्सी नंबर आणि नाव सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओची सुरुवात कर्णधार केन विल्यम्सनची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांपासून करण्यात आली आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्याला मोठ्या प्रमाणात लाईक्स मिळाल्या आहेत.
वर्ल्डकपसाठी न्यूझीलंड संघ – केन विल्यम्सन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, ईश सोधी, टिम साउदी, विल यंग.









