पाणी वाहून जाण्याऐवजी रस्त्यावर तुंबत असल्याने मनपाने लक्ष देण्याची मागणी
बेळगाव : महानगरपालिकेच्यावतीने सिद्धेश्वर रोड, पहिला मळ्ळीकेरी-कणबर्गी येथे दोन्ही बाजूला नवीन गटारी बांधण्यात आल्या आहेत. मात्र, रस्त्यापेक्षा गटारींची उंची अधिक झाली असल्याने रस्त्यावरील पाणी वाहून जाण्याऐवजी ते तेथेच तुंबून रहात आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबले असून जर पाण्यातून वाट शोधत नागरिकांना ये-जा करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे मनपाने याकडे लक्ष घालून रस्त्याची उंची वाढवावी, अशी मागणी केली जात आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेच्यावतीने मळ्ळीकेरी येथील रस्त्याच्या दोहो बाजूला नवीन काँक्रिटच्या गटारी बांधल्या आहेत.
सदर गटारी रस्त्यापेक्षा खाली असणे गरजेचे होते. मात्र, अशास्त्रीय पद्धतीने रस्त्यापेक्षा गटारींची उंची जवळपास चार ते पाच फुटांनी वाढविण्यात आली आहे. पावसाळ्यातही या मार्गावर पाणी तुंबले होते. याबाबत महापालिकेला कल्पना देऊन देखील सदर समस्या मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यानंतर बुधवारी झालेल्या पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी तुंबले असून यामुळे ग्रामस्थांना समस्येला तोंड देण्याची वेळ आली आहे. तातडीने महापालिकेने रस्त्यावर भराव टाकून उंची वाढवावी, जेणेकरून सांडपाणी व पावसाचे पाणी वाहून जाण्यास मदत होईल, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.









