विद्यार्थ्यांची गैरसोय : लक्ष देण्याची मागणी
सांबरा : कणबर्गी येथील सरकारी पूर्ण मराठी प्राथमिक शाळेच्या इमारतीला गळती लागली असल्याने मुलांची गैरसोय होत आहे. तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन गैरसोय त्वरित दूर करावी अशी मागणी होत आहे . साधारण पंधरा वर्षे जुनी असलेल्या इमारतीला गळती लागली आहे. या इमारतीतील तिसरी व चौथीच्या वर्ग खोलीमध्ये गळती लागली आहे. शाळेमध्ये एकूण पहिली ते सातवी असे सात वर्ग खोल्या आहेत. यातील दोन खोल्यांमध्ये गळती लागली असल्याने मुलांना इतरत्र बसविण्यात येत आहे. त्यामुळे इतर वर्गातील मुलांच्या अभ्यासावरही याचा परिणाम होत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन गैरसोय दूर करावी अशी मागणी शाळा सुधारणा समितीने केली आहे.
तातडीने गळती काढा : किसन सुंठकर, एसडीएमसी अध्यक्ष
गेल्या तीन चार दिवसापासून पावसाचा जोर वाढला असल्यामुळे दोन वर्ग खोल्यांमध्ये गळतीही सुरू झाली आहे. सदर प्रकार शिक्षणाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला असून त्यांनी तातडीने गळती काढण्याचे आदेश द्यावेत व विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.









