तलावाचा आकार वाढविण्याची ग्रामस्थांची मागणी : विसर्जन केलेल्या मूर्ती बाजूला करून उर्वरित मूर्तींचे विसर्जन
बेळगाव : कणबर्गी येथील विसर्जन तलावात गावातील घरगुती व सार्वजनिक श्री मूर्तीचे विसर्जन करण्यासह शेजारील कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड, खनगाव आदी गावातील सार्वजनिक श्री मूर्तींचेही शनिवारी विसर्जन करण्यात आले. मात्र तलावाच्या तुलनेत श्री मूर्तीची विसर्जन संख्या वाढल्याने तलाव दुपारी 4 वा. मूर्तींनी तुडुंब भरला होता. त्यामुळे मनपा कर्मचारी व पोलिसांनी विसर्जन करण्यात आलेल्या मूर्ती बाजूला करून उर्वरित गणपती मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी जागा करून दिली. भविष्यात ही समस्या उदभवू नये, यासाठी तलावाचा आकार वाढविण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.
महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या शहर व उपनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कणबर्गीसह एकूण 9 ठिकाणी तलाव सज्ज ठेवण्यात आले होते. त्याचबरोबर फिरत्या विसर्जन कुंडांचीही व्यवस्था करण्यात आली होती. कणबर्गी येथील विसर्जन तलावात या पूर्वी केवळ गावातील घरगुती व सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात होते. पण यंदा ग्रामस्थांसह कलखांब, मुचंडी, अष्टे, चंदगड, खनगाव आदी गावातील सार्वजनिक श्रीमूर्तीही विसर्जनासाठी आणण्यात आल्या होत्या. तलावाच्या क्षमतेपेक्षा मूर्तीची संख्या वाढल्याने दुपारी 4 वाजताच मूर्तींनी तलाव तुंडूंब भरला. परिणामी उर्वरित गणेशमूर्ती विसर्जन करण्याची समस्या निर्माण झाली.
परिसरातील गणेश मूर्ती विसर्जनासाठी आणल्याने समस्या
त्याठिकाणी तैनात असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तलावात विसर्जन केलेल्या मूर्ती एका बाजूला करून उर्वरित गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी जागा करून दिली. कणबर्गी या एका गावात तब्बल 18 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. त्याचबरोबर आजूबाजुच्या गावातील सार्वजनिक गणेश मूर्तीदेखील या तलावात विसर्जन करण्यासाठी आणण्यात आल्याने मोठी समस्या निर्माण झाली. भविष्यात ही समस्या पुन्हा उदभवू नये, यासाठी महापालिकेकडून तलावाचा आकार वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.









