वृत्तसंस्था / दुबई
आयसीसीतर्फे सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूची निवड करण्यात आली असून लंकेचा धडाकेबाज फलंदाज कमिंदू मेंडीसची या पुरस्कारासाठी घोषणा केली आहे.
आयसीसीतर्फे हा पुरस्कार पुरुष आणि महिलांच्या विभागात प्रत्येक महिन्यातील खेळाडूंच्या कामगिरीचा आढावा घेवून केला जातो. सप्टेंबर महिन्यामध्ये लंकन संघातील फलंदाज कमिंदू मेंडीसने चार कसोटी सामन्यात 90.20 धावांच्या सरासरीने 451 धावा जमविल्याने त्याची सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली. इंग्लंड बरोबर ओव्हल मैदानात झालेल्या कसोटी सामन्यात कमिंदू मेंडीसच्या दमदार फलंदाजीने लंकेने शानदार विजय मिळविला होता. तत्पूर्वी न्यूझीलंड विरुद्ध लंकेने पहिल्यांदाच कसोटी मालिका विजय मिळविला. या मालिकेत कमिंदू मेंडीसने दोन शतके नोंदविली होती. 2024 च्या क्रिकेट हंगामात आयसीसीचा सर्वोत्तम मासिक पुरस्कार दोनवेळा मिळविणारा कमिंदू मेंडीस हा लंकेचा पहिला फलंदाज आहे. यावेळी या पुरस्काराच्या शर्यतीमध्ये कमिंदु मेंडीस, प्रभात जयसुर्या व ऑस्ट्रेलियाचा ट्रेव्हिस हेड यांच्यात चुरस निर्माण झाली होती. पण कमिंदु मेंडीसने या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकाविला. कमिंदू मेंडीसने आतापर्यंत 8 कसोटी सामन्यात 91.27 धावांच्या सरासरीने 13 डावांत 1004 धावा जमविल्या असून त्यामध्ये 5 शतके आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.









