कंग्राळी बुद्रुक कुस्ती मैदान : इतर चटकदार कुस्त्यांमुळे कुस्तीशौकीन उत्साही
वार्ताहर/ कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक येथील बाल तरुण युवक मंडळ, बाहेर गल्ली कुस्तीगिर संघटना व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी देवीच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानिमित्त आयोजित कुस्ती मैदानात कंग्राळीच्या कामेश पाटीलने सांगलीच्या प्रदीप ठाकुरला अवघ्या मिनिटात दोन्ही हाताचे हफ्ते भरुन हफ्ते डावावर आसमान दाखवित उपस्थित कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
प्रमुख कुस्ती रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी कंग्राळीचा उगवता मल्ल कामेश पाटील व सांगलीचा प्रदीप ठाकुर ही कुस्ती मल्लाप्पा पाटील, यल्लप्पा पाटील, दत्ता पाटील, संजय कडोलकर, ओमकार मेलगे, मारुती पाटील, राजू मन्नोळकर आदी मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत पहिले काही सेकंद दोघांनी एकमेकांची ताकद आजमावण्याचा प्रयत्न केला. कामेशने आपल्या उजव्या पवित्रात खेळताना प्रविण ठाकुरला एकेरी पट काढण्याचे दाखवित दोन्ही हाताचे हफ्ते भरुन प्रविण ठाकुरला नकळत हफ्ते डावावर चीत करुन उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती प्रदीप पाटील, श्रीकांत लमाणी, प्रभाकर बेळगावकर यांच्या हस्ते संजू इंगळगी व पवन चिक्कदीनकोप यांच्यात लावण्यात आली. या कुस्तीत संजू इंगळगीने दुहेरी पट काढून पवन चिक्कदीनकोपला खाली घेत झोळी भरुन झोळीवर चीत केले. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रथमेश हट्टीकरने गौस याला एकलांगी भरुन घिस्सा डावावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण बलदंड ताकदीच्या गौसने त्यातून सुटका करुन घेतली. ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली पण वेळेअभावी कुस्ती गुणावर घेण्यात आली. प्रथमेशने एकेरी पट काढून गुण मिळवित गौसवर विजय मिळविला. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत निखिल कंग्राळीने मारुतीचा ढाकेवर विजय मिळवला.
पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत महेश बिर्जे तिर्थकुंडे व यलालिंग भांदुर गल्ली यांच्यात झाली. ही कुस्ती डाव प्रतिडावाने झुंजली तर वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. सहाव्या क्रमांकाची कुस्ती सिद्धार्थ तिर्थकुंडेने राहुल माचिगडवर एकलांगीवर विजय मिळविला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत हर्ष कंग्राळीने शंकर तिर्थकुंडेचा ढाकेवर विजय मिळवला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत सुशांत कंग्राळीने सिद्धार्थ सांबऱ्यावर एकचाक डावावर विजय मिळवला.
सदर कुस्ती मैदानात बेळगाव महापौर केसरी विजेते गुंडू पाटील, गुणवंत कडोलकर परशराम पाटील, यांच्या स्मरणार्थ या कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. नुकतेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व कुस्ती प्रशिक्षक काशिराम पाटील यांचे निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
आखाड्याचे उद्घाटन व दीपप्रज्वलन विजय पावशे, अर्चना पठाणे, संध्या चौगुले, युवराज जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्री हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. साईराज पाटील विरुद्ध करण पाटील यांच्यात उद्घाटनाची कुस्ती झाली. त्यानंतर श्री घाडी, गगन आलारवाड, श्रीहरी अनगोळ, भक्ती मोदेकोप, प्रसाद डोंबले हिंडलगा, ज्ञानेश्वर बेकिनकेरे, आदर्श कंग्राळी, आदित्य कंग्राळी, हरीश मास्कोनट्टी, प्रतिक कंग्राळी, राजू कंग्राळी, मदन कंग्राळी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करुन विजय मिळविला. रोहित तिर्थकुंडे, पार्थ कंग्राळी ही कुस्ती बरोबरीत राहिली.
आखाड्याचे पंच म्हणून नाथाजी पाटील, शंकर पाटील, भाऊ पाटील, किरण पाटील, नाना पाटील, भाऊराव पाटील, प्रशांत पाटील, जयराम पावशे, पिंटू पाटील यांनी काम पाहिले.
30 वर्षानंतर पुन्हा सुरुवात
कंग्राळी खुर्द येथे गेली काही वर्षे कुस्ती मैदान बंद पडले होते. पण सध्या बेळगाव जिल्ह्यात खेडोपाड्यात कुस्तीची मैदाने भरवली जात आहेत. कंग्राळी गावात सध्या पूर्वीच्या ओस पडलेल्या तालमीतून पुन्हा कुस्तीची परंपरा सुरु झाली आहे. कृष्णा पाटील, कै. काशिनाथ पाटील व ऑलिंपिकपटू एम. आर. पाटील यांनी खंडीत पडलेली कुस्तीची परंपरा सुरु केली आहे. त्याचप्रमाणे कंग्राळीचा मल्ल कै. गुंडू पाटील, गुणवंत कडोलकर, परशराम पाटील, गोपाळ पाटील, बाबू पाटील, शिवाजी पाटील, पुंडलिक पाटील, कल्लाप्पा पाटील आदी नामवंत मल्ल होऊन गेले. सध्याचे तरुण इतर व्यसनाकडे वळले आहेत. अशा तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा कुस्तीची परंपरा सुरु करण्यासाठी कंग्राळी खुर्द येथे 30 वर्षानंतर पुन्हा कुस्तीचे मैदान भरविण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी जोड पाहून खळ्याच्या कुस्त्या नेमण्यात आल्या. पुढील वर्षीपासून मोठ्या प्रमाणात कुस्ती मैदान भरविले जाईल. त्यासाठी आतापासूनच संघटना तयारीला लागली आहे. कंग्राळी खुर्दप्रमाणे काही इतर गावातही कुस्ती मैदानात खंड पडला आहे. तिही मैदाने सुरु करुन बेळगावच्या होतकरु मल्लांना वाव देण्याची मागणी होत आहे.









