वार्ताहर,सुळे
मल्हारपेठ ( ता. पन्हाळा )येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत शाहू कुस्ती केंद्राचा पैलवान कामेश पाटील याने प्रतिस्पर्धी अनिरुद्ध पाटील ( आमशी-सेनादल) याला 18 व्या मिनिटाला घुटना डावावर आस्मान दाखवत हजारो कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली. तो रोख 50 हजार रुपये व मानाच्या चांदीच्या गदेचा मानकरी ठरला. मैदानात कुस्त्या पाहण्यासाठी पंचक्रोशीतील कुस्तीशौकिनांनी मोठी गर्दी केली होती.
ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त मल्हारपेठेतील मॉन्स्टर बॉईजच्यावतीने कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने कुस्ती मैदान घेतले.आखाडापूजन उद्योगपती व लक्ष्मीबाई धोंडू नारकर चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक नारकर, उपसरपंच राजेंद्र महाजन तसेच जुन्या काळातील पैलवान हिंदुराव गोपाळा कापसे,वसंत रामचंद्र महाजन, शामराव हरी नारकर आदींच्या हस्ते करण्यात आले.
कामेश पाटील व अनिरुद्ध पाटील यांची कुस्ती रात्री दहा वाजता सुरू झाली.सुरुवातीला दोघांनीही ताकदीचा अंदाज घेतला.कुस्तीच्या सुरुवातीला अनिरुद्ध पाटील आक्रमक वाटत होता.त्याने कामेशला ढाक लावून दोनदा चितपट करण्याचा प्रयत्न केला.परंतु कामेशने ते प्रयत्न यशस्वी होऊ दिले नाही.त्यानंतर कामेशने अनिरुद्धच्या पाठीवर जाऊन त्याचा कब्जा घेतला.त्याचा घुटना डावावर अनिरुद्धला चितपत करण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला.अखेरीस अठराव्या मिनिटाला पुन्हा कामेशने घुटना डावा डावावर पकड घेत अनिरुद्धला चितपट केले व उपस्थित कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली.दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती इंद्रजीत नामदेव मोळे (घरपण) व रामा माने (वारणानगर) खूपच खडाजंगीची झाली.अर्धा तास चाललेली ही कुस्ती अखेरीस गुणावर घेण्यात आली.यामध्ये इंद्रजीत मोळे याने बाजी मारत विजय मिळविला. तो रोख 35 हजार रुपये व चांदीच्या मानाच्या गदेचा मानकरी ठरला.तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत नवनाथ गोटम ( गोटमवाडी) याने भारत पाटील ( कोपार्डे ) याच्यावर विजय मिळवून 25 हजार रुपये व चांदीची गदा मिळवली. चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत संकेत पाटील ( कोगे ) याने हृदयनाथ पाचाकटे ( पाचाकटेवाडी) याच्यावर विजय मिळविला. पाचव्या क्रमांकासाठी झालेल्या कुस्तीत अरुण पाटील (भामटे) याने सुदर्शन पाटील (पुनाळ) याच्यावर विजय मिळविला. महिला कुस्तीत गौरी पाटील ( वाघूर्डे ) हिने घिस्सा डावावरती गायत्री माने (आसूर्ले) हिच्यावरती विजय मिळविला तर धनश्री नवलव (नवलेवाडी) हिने झोळी डावावरती वैष्णवी चौगुले (आळवे) हिच्यावरती विजय मिळविला. महिला कुस्तीपटूंनी डाव – प्रतिडावानी चटकदार कुस्त्या करून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली.
राजाराम पाटील (आमशी) सचिन पाटील (सावर्डे), शहाजी पाटील (सावर्डे), बाबा शिरगावकर (कोपर्डे), बाजीराव पाटील (वाकरे), श्रीकांत मोळे (घरपण), संजय पाटील (सावर्डे), नामदेव भोसले,बापू गिरीबुवा (मल्हारपेठ) यांनी पंच म्हणून कामगिरी पार पाडली.यावेळी सरपंच शारदा दत्तात्रय पाटील,गवळदेव दूध संस्थेचे संस्थापक संजय दिनकर मोरे,दै. तरुण भारत संवादचे विशेष प्रतिनिधी कृष्णात चौगले,माजी ग्रा.प. सदस्य सुदर्शन पाटील,मल्हारपेठचे माजी सरपंच, विद्यमान सदस्य सिताराम सातपुते,सावर्डेचे सरपंच संभाजी कापडे,मोरवाडीचे सरपंच डॉ. रणजित तांदळे, प्रसिद्ध व्यापारी शिवाजी महाजन,बबन धनलोभे,चंद्रकांत धनलोभे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नारायण सातपुते, अरुण धनलोभे, महादेव महाजन यांच्यासह ग्रामस्थ व विभागातील कुस्ती शौकिन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
निवेदकांनी सांगितला इतिहास अन् भवितव्य
मल्हारपेठेतील कुस्ती मैदानात करवीर तालुक्यातील दोनवडे येथील समालोचन यशवंत पाटील यांनी खुमासदार समालोचन केले. त्यांनी आपल्या समालोचनामध्ये यापूर्वी कोणकोणत्या मोठ्या पैलवानांनी मैदान गाजवले. मैदानावर प्रत्यक्ष खेळणाऱ्या पैलवानांचे डाव-प्रतिडाव, कौशल्य त्यांना यशाच्या कोणत्या टप्प्यापर्यंत पोहोचवू शकते आदी बाबींचा त्यांनी समालोचनातून उहापोह केला. तसेच कुस्तीला लोकाश्रय मिळत असला तरी अजूनही त्यामध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक असून तिजोरीतील पैसा काढून पैलवान घडवा असे आवाहन देखील पाटील यांनी केले.
Previous Articleशरद पवार कोणती भूमिका मांडणार? राज्यासह देशाचे लागले लक्ष
Next Article लग्नाआधी की नंतर, नवरीने हेअर ट्रीटमेंट कधी घ्यावी ?









