पार्थ पाटील, संभाजी-काकतीचा प्रेक्षणीय विजय
वार्ताहर/अरुण टुमरी
काकती येथे श्री सिद्धेश्वर देवस्थान यात्रा समिती आयोजित सिद्धेश्वर यात्रेनिमित्त भव्य कुस्ती मैदानात 37 मिनिटानंतर बेळगावच्या कामेश कंग्राळीने हरिषकुमार हरियाणाला गुणावर पराभव केला. तर पार्थ पाटीलने प्रवीणकुमारवर एकलांगी डावावर पराभव करुन उपस्थित 15 हजारांहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. आकर्षण कुस्तीत संभाजी प्रमोजीने रोहीत माचिगडवर प्रेक्षणीय विजय मिळविला.

प्रमुख कुस्ती हरियाणा चॅम्पियन हरिषकुमार व कर्नाटक चॅम्पियन कामेश पाटील कंग्राळी ही कुस्ती सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी यांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला हरिषकुमारने एकेरीपट काढून कामेशला खाली घेतले व मानेवरती घुटणा ठेवून चित करण्याचा प्रयत्न केला. पण खालुन डंकी मारुन कामेशने चित करण्याचा प्रयत्न त्यातून हरिषने सुटका करुन घेतली. दहाव्या मिनिटाला कामेशने हप्ते भरुन हरिषला खाली घेत पायलावून घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला. पण हरिषची एकबाजुची पाठ जमिनीला न लागल्याने पंचांनी पुन्हा कुस्ती खडाखडी सुरू केली. 17 व्या मिनिटाला हरिषने एकेरीपट काढून कामेशला खाली घेत घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. यावेळीही कामेशने आतुन डंकी मारुन पुन्हा सालतो मारण्याचा प्रयत्न केला. यावेळीही हरिषने सुटका करुन घेतली. 37 मिनिटानंतर पंच विश्वनाथ पाटील व संभा कडोलकर यांनी कुस्ती गुणावर निकाल करण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच मिनिटाला कामेशने एकेरीपट काढून हरिषवर ताबा मिळवित गुण मिळवून विजयी मिळविला.

दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन प्रेम जाधव-कंग्राळी व रोहन मुरगोड सुरेश जनगौडा, तानाजी अष्टेकर, लक्ष्मणराव मोहीते, बसवाणी टुमरी, अनिल गवळी, भावकाण्णा मुंगारी, काकती पोलीस स्थानकाचे निरीक्षक सुरेश शिंगे आदी मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत तिसऱ्या मिनिटाला प्रेमने ढाक मारुन रोहनला खाली घेतले. पण रोहनने त्यातून सुटका करुन घेतली. पाचव्या रोहनने एकेरीपट काढून प्रेमवर कब्जा मिळवित एकचाक डावावरती फिरविण्याचा प्रयत्न केला. पण प्रेमने त्यातून सुटका करुन घेतली. 12 व्या मिनिटाला प्रेम जाधवने एकेरीपट काढून हप्त्या डावावरती फिरविण्याचा प्रयत्न करताना कुस्ती मैदानाबाहेर फेकली गेली. त्यावेळी रोहनला हाताला दुखापत झाली. त्यामुळे प्रेम जाधवला विजयी घोषीत करण्यात आले.
तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती बेळगावचा उगवता मल्ल पार्थ पाटील-कंग्राळी व हरियाणा कुमार प्रवीणकुमार-हरियाणा ही कुस्ती विश्वनाथ पाटील, बसवराज गाणगेर, शिवाजी पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते लावण्यात आली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला पार्थ पाटीलने एकेरीपट काढून प्रवीणवर कब्जा मिळवित घिस्स्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला. पण प्रवीणने त्यातून सुटका करुन घेतली. पाचव्यहा मिनिटाला पार्थने दुहेरीपट काढून प्रवीणकुमारला खाली घेत मानेवर घुटणा ठेवून मानेवर फिरविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रवीणने त्यातून सुटका करत असताना पार्थने पायाला एकलांगी भरुन एकलांगीवरती नेत्रदीपक विजय मिळविला.
चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत विक्रम शिनोळी न आल्यामुळे पृथ्वीराज पाटील-कंग्राळीला विजयी घोषित करण्यात आले. पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत रामदास काकतीने कुमार पैलवान गोकाकला घुटणा डावावरती विजय मिळवून उपस्थितीत कुस्ती शौकिनांची वाहवा मिळविली. सहाव्या क्रमांकाच्या कुस्ती सुफियन सय्यद राशिवडेने महेश तीर्थकुंडयेचा घिस्यावर पराभव केला. सातव्या क्रमांकाची कुस्ती प्रथमेश हट्टीकर-कंग्राळी व ओमकार राशिवडे यांच्यात झाली. ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. पण वेळेअभावी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत रोहन कडोलीने भूमीपुत्र मुतगा याला एकचाक डावावरती चित केले. नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत निरंजन येळ्ळूरने परसु हरिहरला घुटणा डावावरती पराभव केला. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रज्वल कडोलीने मंथन तिप्पाण्णाचे-सांबराचा घिस्यावरती पराभव केला. अकराव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रवण उचगावने शुभम हट्टीकरचा पराभव केला. सुहास-खादरवाडी, सिद्धार्थ काकती, मोहीत काकती, ओमकार कंग्राळी, प्रतिक कंग्राळी, प्रज्वल मच्छे, निखील कंग्राळी, प्रज्वल कडोली आदी मल्लांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविले.
महिलांच्या कुस्तीत स्वाती पाटील-स्पोर्ट्स हॉस्टेल व प्रांजल अवचारहट्टी ही कुस्ती डावप्रतिडावाने झुंजली. शेवटी ही कुस्ती गुणावर झाली. त्यात स्वातीने एकेरीपट काढत गुण मिळवित विजय मिळविला. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती भक्ती पाटील-कंग्राळी व भाग्यश्री स्पोर्ट्स हॉस्टेल ही कुस्ती डावप्रतिडावांनी झुंजली. पण वेळेअभावी ही कुस्ती बरोबरीत सोडविली.
आकर्षक कुस्तीत संभाजी प्रमोजी-काकती व रोहीत माचिगड या कुस्तीत संभाजी काकतीने घुटणा डावावरती पराभव करुन उपस्थितीत कुस्ती शौकिनांकडून वाहवा मिळविली. या कुस्तीनंतर संभाजीचे खास कौतुक करण्यात आली. आखाड्याचे पंच म्हणून विश्वनाथ पाटील, शिवाजी पाटील, गणपत बन्नोशी, प्रशांत पाटील-कंग्राळी, संभा कडोलकर आदींनी काम पाहिले.









