सुधाकर काशीद, कोल्हापूर
Kolhapur News : काळम्मावाडी धरणासाठी यांचे गाव उठवण्यात आले.गावातल्या सर्वांचे शिरोळ,कागल तालुक्यात पुनर्वसन सुरू झाले.दहा वेळा मागे फिरून फिरून बघत भरल्या डोळ्यांनी सर्वांनी गाव सोडले. गावातली घरे शेत जमिनी,सारवलेली अंगणे मारुती,विठ्ठलाईचे देऊळ,देवळाजवळचे जांभळाचे झाड सारे काही हळूहळू धरणाच्या पाण्याखाली गेले.जसजसे पाणी वाढू लागले तसे एक दिवस या गावातील माणसांच्या वहिवाटीचे पिढ्या-पिढ्याचे अस्तित्व धरणाच्या पसरत गेलेल्या जलाशयात गडप झाले. पण या गावातील माणसांच्या मनात घर करून राहिलेले गाव त्यांना पुन्हा पुन्हा कायम खुणावत राहिले.
काळमवाडी धरणाच्या जलाशयात गेलेल्या प्रकल्प बाधित कांबर्डे (ता. राधानगरी) या गावच्या रहिवाशांची ही गावाशी जोडली गेलेली एक अतूट अशी नाळ आहे.आता दरवर्षी काय होते? धरणाच्या पाण्याची पातळी उन्हाळ्यात कमी होते.आणि बुडालेल्या गावाच्या भग्न अवशेषाचा एक एक दगड पुन्हा दिसायला सुरुवात होते.आपल्या पिढ्यानपिढ्याच्या गावाचे असे भग्न का होईना वर्षातून एकदा दर्शन होते म्हणून गावकऱ्यांची एखादी तरी फेरी धरणाकडे होते.तिथे आपले घर ,तिथे गोठा, तिथे राण्याचे घर ,तिथे भांगुललकरांचे खळे,तिथे मारुतीच्या देवळाचा व्हरांडा,तिथे वडाच्या झाडाचा कट्टा अशी आठवत आठवत दर्शन घेतले जाते.आणि पुन्हा नव्याने पुनर्वसन झालेल्या गावाकडे जड पावलाने परतले जाते.आपापल्या गावाशी माणसाचे कसे अतूट नाते जोडले गेलेले असते त्याचे दर्शन गेले काही दिवस काळम्मावाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दिसत आहे. कारण उन्हाळ्यामुळे धरणाच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे.आणि बुडालेल्या गावांचे उरलेसुरले अस्तित्व पुन्हा दिसू लागले आहे.
काळम्मावाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र जेथे आहे तिथे कांबर्डे ,आसनगाव,नाणीवळे,जर्कि,धनगर वाडा,जळकेवाडा,भांडणे,भांडण्याचा हुडा,राघूचा धनगरवाडा अशी अनेक छोटी छोटी गावे होती.जनावरे व पोटापुरती जमीन,खळखळणाऱ्या झाडाचे पाणी,हिरवीगाझाडी,आंबा,चिंच,जांभूळ,करवंदे,आळू काजू,फणस,नेरली,कांगून्या या रानमेव्याची खैरात होती.हिरव्यागार गवतावर फक्त गाई म्हशींची आणि शेरडांचीच मालकी होती.40 वर्षांपूर्वी काळमवाडी धरणाची चर्चा सुरू झाली.जागा निश्चित झाली.अर्थात जिह्याच्या सिंचनासाठी त्याची मोठी गरज होती.मग धरण क्षेत्रात येणारी ही गावे उठवण्यास सुरुवात झाली.शिरोळ,कागल,हातकणंगले तालुक्यात पुनर्व सीत धरणग्रस्तांची वसाहत उभी राहिली.पुनर्वसन पूर्ण क्षमतेने झाले की नाही हा वेगळाच मुद्दा आहे.पण या गावक्रयांना आपल्या मूळ गावातील घर ,शेती, खळे तिथली त्यांची पिढ्या-पिढ्यांची वहिवाट सोडून गाव सोडावे लागले.या आपल्या गावाशी त्यांची जोडलेली नाळ अतूट आहे.आता मूळ कांबर्डे गाव जेथे होते तिथले धरणाचे पाणी आटले आहे.गावातल्या मारुतीच्या मंदिराचा ओटा,होळीचा कट्टा,घरांचे कट्टे, पाण्यात भिजून भिजून राठ झालेल्या झाडांचे बुंधे,बोरींगचा नळ दिसू लागलाय.आणि हे दिसू लागलं की गावक्रयांनी एकदा तिकडे जाऊन गावाचे दर्शन घ्यायचे हे ठरूनच गेले आहे.माणूस आपल्या गावाशी मनातून कसा घट्ट जोडला गेलेला असतो याचेच एक उदाहरण आहे.
गावातले सुखच वेगळे…
आमचे गाव छोटे होते. लाईट नव्हती. डांबरी रस्ता नव्हता. पण तरीही आम्ही राधानगरीच्या या निसर्ग सहवासात खूप सुखी होतो. फार नाही पण पोटापाण्यापुरते मिळवत होतो. कसला आजार नव्हता. दूध दु भते होते. आता पुनर्वसन झाले आहे. माळावर घरे बांधून दिली आहेत. लाईट, पाणी, टीव्ही आहे. पण त्या हिरव्यागार ,लाल मातीच्या रस्त्याच्या मूळ गावाची ओढ आजही आमच्या मनात कायम आहे.
दादू भोगुलकर, प्रदिप राणे
Previous Articleसैनिकांसाठी रक्तदानाचा संकल्प; एक लाख युवक होणार सहभागी -डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील
Next Article ओटवणेतील कारचालकास गोव्यातील पर्यटकांकडून मारहाण !









