सभापती रमेश तवडकर यांच्याकडून सुनावणी, पक्षविरोधी कारवायांत गुंतल्याचा काँग्रेसचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
काँग्रेसच्या दोन बंडखोर आमदारांविरोधात दाखल करण्यात आलेल्या अपात्रता याचिकेवर सभापती रमेश तवडकर यांनी शुक्रवारी पहिली सुनावणी घेतली. त्यावर उत्तर दाखल करण्यासाठी त्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री तथा आमदार दिगंबर कामत आणि आमदार मायकल लोबो यांच्याविरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी 11 जुलै 2022 रोजी सभापतींसमोर अपात्रतेची याचिका दाखल केली होती. त्यात पक्षविरोधी कारवाया आणि पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप वरील दोघांवरही करण्यात आला होता. या प्रकरणाच्या पुढील सुनावणीची तारीख 30 दिवसांनी ठरवली जाईल, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
प्रतिवादींनी मागितला अवधी
सुनावणीवेळी दोन्ही प्रतिवादींचे वकील सुनावणीसाठी हजर होते. उत्तर दाखल करण्यासाठी त्यांनी 30 दिवसांचा अवधी मागितला होता, तो त्यांना मंजूर करण्यात आला. तसेच त्यांना ’प्रतिवादकर्त्यांची प्रत’ देण्यात आली आहे. त्यांनाही या प्रकरणाचा अभ्यास करायचा आहे,’ असे तवडकर म्हणाले.

पक्षविरोधी कारवायांत गुंतल्याचा आरोप
हे दोन्ही आमदार पक्षविरोधी कारवायांमध्ये गुंतले होते आणि काँग्रेसचे आमदार फोडण्याचा प्रयत्न करत होते, हे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरावे आहेत, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी केला आहे.
सभापतींसमोर आणखी याचिका
त्याशिवाय 14 सप्टेंबर रोजी भाजपमध्ये गेलेल्या आठही आमदारांविरुद्ध दि. 9 डिसेंबर रोजी काँग्रेसने अपात्रतेची दुसरी याचिका दाखल आहे. त्याव्यतिरिक्त या 8 आमदारांविरोधात काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच डॉम्निक नोरोन्हा यांनी आणखी दोन वैयक्तिक याचिका दाखल केल्या होत्या. त्यात त्यांना विधानसभा सदस्य म्हणून अपात्र ठरवण्याची विनंती केली होती.
आठ आमदारांविरुद्धचीही याचिका
दि. 14 सप्टेंबर रोजी आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, डिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, राजेश फळदेसाई, आलेक्स सिक्वेरा आणि रुडॉल्फ फर्नांडीस या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर 40 सदस्यीय सभागृहात काँग्रेसचे केवळ तीन आमदार शिल्लक राहिले होते.
कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही ः तवडकर
येत्या दि. 16 जानेवारी पासून विधानसभेचे चार दिवसांचे हिवाळी अधिवेशन होणार आहे. अशाप्रकारे अल्पावधीचे अधिवेशन घेत असल्याबद्दल विरोधकांनी सभापतींवर आरोप करताना ते सरकारच्या दबावाखाली वावरत असल्याचे म्हटले आहे. त्यासंबंधी सभापतींना विचारले असता सदर आरोपांचे त्यांनी खंडण केले. आपण कुणाच्याही दबावाखाली काम करत नाही. हिवाळी अधिवेशन केवळ चार ते पाच दिवसच घेण्याचा पूर्वीपासूनच प्रघात आहे, असे सांगून आपण घेतलेले निर्णय हे सभापती या नात्याने आपल्या अधिकाराच्या कक्षेत असल्याचे तवडकर यांनी सांगितले.









