पायलट अन् गेहलोत यांच्यात राजकीय लढाई ः तोडगा काढण्याचा काँग्रेसचा प्रयत्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
सचिन पायलट यांच्या एकदिवसीय उपोषणानंतर राजस्थान काँग्रेसमधील हालचालींना वेग आला आहे. पुन्हा एकदा पक्ष दोन गटांमध्ये विभागताना दिसून येत आहे. याचदरम्यान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना पक्षाच्या राजस्थान शाखेमध्ये निर्माण झालेले संकट दूर करण्याची जबाबदारी मिळाली आहे. कमलनाथ यांना राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावण्याचे काम सोपविण्यात आले आहे.
कमलनाथ यांनी काँग्रेस संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांच्यासोबत पायलट यांची भेट घेतली आहे. या भेटीत राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री पायलट यांनी माझे उपोषण केवळ भ्रष्टाचार विरोधातील कारवाईच्या उद्देशाने करण्यात आले होते आणि ते पक्षविरोधी नव्हते असा दावा केला आहे. पायलट हे काँग्रेसकडून राजस्थानचे मुख्यमंत्री पद दिले जात नसल्याचे नाराज असल्याचे मानले जात आहे.
कमलनाथ अन् वेणगुपोल यांनी पायलट यांच्यासोबत केलेली चर्चा सौहार्दपूर्ण राहिली असली तरीही यातून कुठलाच ठोस तोडगा निघाला नसल्याचे समजते. दुसरीकडे काँग्रेसचे राजस्थान प्रभारी सुखजिंदर सिंह रंधावा यांनी पक्षप्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी राजस्थान मुद्दय़ावर चर्चेसाठी दोन दिवसांमध्ये दुसऱयांदा भेट घेतली आहे. तसेच रंधावा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती.
सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न
पायलट यांचे उपोषण ‘पक्षविरोधी’ म्हटले जाऊ शकत नसल्याचा दावा त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे. मागील वर्षी विधिमंडळातील पक्षाची बैठक आयोजित करण्याच्या निर्देशाची अवहेलना करणाऱया गेहलोत यांच्या निष्ठावंतांच्या विरोधात कारवाई का करण्यात आली नाही असा प्रश्न पायलट समर्थक करत आहेत. गेहलोत आणि पायलट यांच्यातील या राजकीय संघर्षामुळे काँग्रेस नेतृत्व पेचात सापडले आहे. याचमुळे दोन्ही नेत्यांदरम्यान शिष्टाई घडवून आणण्याचा प्रयत्न पक्षनेतृत्वाकडून केला जात आहे. गेहलोत हे गांधी कुटुंबाचे निष्ठावंत मानले जातात. तसेच ते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आहेत. तर दुसरीकडे पायलट यांना सध्या प्रियांका वड्रा यांचा पाठिंबा असल्याचे मानण्यात येते.
नाव वसुंधरा राजेंचे, निशाणा गेहलोतांवर
वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे राजस्थानात सरकार असताना काँग्रेसने भ्रष्टाचाराचे अनेक आरोप केले होते. हे आरोप गेहलोत आणि पायलट या दोघांच्या नेतृत्वाखाली पक्षाकडून करण्यात आले होते. या आरोपांवर राज्यात सत्तेवर येऊनही गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकारने कुठलीच कारवाई केली नसल्याचे म्हणत पायलट त्यांना लक्ष्य करत आहेत. वसुंधरा यांच्या विरोधातील आरोपांवर काँग्रेस सरकारने कारवाई न केल्याचे म्हणत पायलट यांनी एक दिवसीय उपोषणही केले आहे.









