दारोदारी प्रचार मोहिमेस प्रारंभ :
वृत्तसंस्था/ कोईम्बतूर
आगामी लोकसभा निवडणुकीवरून देशातील राष्ट्रीय पक्षांसोबत प्रादेक्षिक पक्षांनी तयारीला वेग दिला आहे. यात कमल हासन यांचा मक्कल निधि मय्यम या पक्षाचेही नाव सामील आहे. एमएनएम पक्षाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीकरता तामिळनाडूतील 12 मतदारसंघांमध्ये उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे. एमएनएमने याकरता तामिळनाडूत प्रचारमोहीम राबविण्यास प्रारंभ केला आहे. पक्ष मक्कालोडु माईम नावाच्या मोहिमेच्या अंतर्गत मतदारांशी संवाद साधून त्यांचे मुद्दे जाणून घेऊ पाहत आहे. एमएनएम पक्ष या मोहिमेद्वारे लोकांशी संपर्क साधण्याकरता घरोघरी जात प्रचारमोहीम राबवत आहे.
एमएनएम नेते कमल हासन यांनी या मोहिमेची सुरुवात कोईम्बतूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून केली आहे. याच मतदारसंघात कमल हासन यांना मागील विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता.
कमल हासन यांचा पक्ष राज्यातील 234 विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचारमोहीम राबविणार आहे. याच्या माध्यमातून पक्ष राज्यांच्या मुद्द्यांवर लोकांचे मत जाणून घेत त्यानुसार लोकसभा निवडणुकीसाठीचे स्वत:चे घोषणापत्र तयार करणार आहे.
कमल हासन यांच्या पक्षाकडून तामिळनाडूच्या कोइम्बतूर आणि मदुराईसाठी लवकरच पदाधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. तर 2026 च्या विधानसभा निवडणुकीसाठी बूथ समितीच्या सदस्यांच्या नियुक्तीवरही पक्षाकडून काम केले जात आहे. कमल हासन यांच्या पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 37 उमेदवार उभे केले होते. यातील 13 मतदारसंघांमध्ये पक्षाला तिसरे स्थान मिळाले होते. तर विधानसभा निवडणुकीत एमएनएम हा पक्ष 180 पैकी 25 मतदारसंघांमध्ये तिसऱ्या स्थानी राहिला होता.
हासन यांच्या पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी 12 मतदारसंघांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेतला आहे. यात चेन्नई दक्षिण, कोइम्बतूर अन् मदुराई या मतदारसंघांना प्राधान्य देण्यात आले आहे.









