मंत्रपठणाच्या गजरात अंत्यसंस्कार
चिकोडी : पैसे परत मागितल्याच्या कारणावरुन निर्घृण खून करण्यात आलेल्या हिरेकोडी (ता. चिकोडी) येथील नंदीपर्वत आश्रमाचे संस्थापक आचार्य श्री 108 कामकुमारनंदी मुनींवर रविवार दि. 9 रोजी दुपारी नंदीपर्वतानजीक असलेल्या शेतवाडीत हजारो भाविकांच्या उपस्थितीत विविध धार्मिक विधी विधान, मंत्रपठणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनंतात विलीन झालेल्या मुनींना हजारो भाविकांनी साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. नांदणी येथील जीनसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, वरुर येथील धर्मसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी, कोल्हापूर येथील लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य स्वामी यांच्या नेतृत्वाखाली आचार्य कामकुमारनंदी मुनी महाराजांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सकाळपासूनच मुनी कामकुमारनंदी यांच्या अंतिम दर्शनासाठी भाविकांची आश्रम परिसरात एकच गर्दी झाली होती. शनिवारी खोदून काढलेल्या त्यांच्या पार्थिवाचे बेळगाव येथील बिम्स रुग्णालयात विच्छेदन करण्यात आले. रविवारी दुपारी 12 वाजता त्यांचे पार्थिव आश्रम परिसरात आणण्यात आले. नंदीपर्वत आश्रमाशेजारी असलेल्या शेतात त्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी करण्यात आली होती. त्यांच्या पार्थिवाला मुनींच्या पूर्वाश्रमीचे चुलत्याचे चिरंजीव डॉ. बाबू भीमाप्पा उगारे यांनी अग्नी दिला. अंत्यसंस्काराचे विविध विधी, विधानाचे कार्य करण्यात येत असताना उपस्थित भाविकांनी णमोकार मंत्राचा जप केला. तसेच मुनी कामकुमारनंदी यांच्या घोषणा देण्यात आल्या. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांना अश्रू अनावर झाले होते. अनेक महिला भाविकांनी अक्षरश: हंबरडा फोडून त्यांचे अंत्यदर्शन घेतले. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेण्यात आला होता. अंत्यसंस्कारावेळी आमदार गणेश हुक्केरी, आमदार लक्ष्मण सवदी, दुर्योधन ऐहोळे, युवा नेते उत्तम पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश नेर्ली, प्रधान कार्यदर्शी सतीश आप्पाजीगोळ उपस्थित होते.
पोलिसांकडून तत्परतेने तपास : लक्ष्मण सवदी, आमदार, अथणी
जैन मुनींच्या निर्घृण हत्येमुळे नागरिक व समाजाला शरमेने मान खाली घालायला लावणारी, मनुकुलावर आघातकारी ही बाब आहे. या घटनेचा जिह्यातील सर्व लोकप्रतिनिधींकडून तीव्र निषेध करण्यात येत असून विधानसभा अधिवेशनात या दुर्घटनेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात येईल. तसेच सरकारचे लक्ष वेधण्यात येईल. सरकारने मुनी, साधू, संत यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना करावी, पोलिसांनी तातडीने प्रकरणाचा तपास करुन पार्थिवाचा व दोषींचा शोध घेतला आहे. जैन मुनी आचार्य कामकुमारनंदी महाराज यांनी धर्म बोधनेचे कार्य करीत धार्मिक प्रसार केला होता. त्यांच्या हत्येमुळे दु:ख झाले आहे. या घटनेचे कोणतेही राजकारण न करता अमानवीय घटनेची नि:पक्षपातीपणे चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
दोषींवर कठोर कारवाई करावी : शशिकला जोल्ले, आमदार, निपाणी
जैन मुनी आचार्य कामकुमारनंदी महाराजांच्या हत्येच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे. जैन धर्मात चातुर्मासाला अत्यंत पवित्र मानले जाते. या मासातच मुनींची हत्या हे अमानुष असून त्याचे दु:ख झाले आहे. अहिंसा परमो धर्माची शिकवण देणाऱ्या जैन मुनींची हत्या होणे ही समाजाला अशोभनीय बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी.
आजच्या मोर्चात सहभागी व्हावे : -उत्तम पाटील, युवा नेते
अहिंसा परमो धर्माच्या मार्गावर समाजाला नेणाऱ्या जैन मुनी आचार्य कामकुमारनंदी महाराज यांची निर्घृण हत्या निषेधार्ह आहे. या घटनेचा आपण निषेध व्यक्त करीत आहोत. तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवारी चिकोडी शहरात मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सर्व जैन बांधवांनी सहभागी व्हावे.









