रत्नागिरी : प्रतिनिधी
कळवंडे लघु पाटबंधारे प्रकल्पावरील अश्मपटल (पिचींग) घसरले होते. याची तात्काळ दखल घेत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनीही प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देवून पहाणी केली. पावसाने घेतलेल्या विश्रांतीमुळे या दुरुस्तीच्या कामाला आज सकाळपासून आणखी वेग आला आहे.
या माती धरणाचे अश्मपटल घसरलेल्या निदर्शनास आल्यानंतर संबंधित ठेकेदार व यांत्रिकी विभागाला यंत्रसामुग्रीसाठी तातडीने सूचना देवून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. काल जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह आणि पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी भर पाऊसात भेट देवून पहाणी केली. तसेच ग्रामस्थांशीही संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून त्यावर तोडगा काढला जाईल, असे सांगितले. ते म्हणाले, या धरणात 30 टक्के पाणीसाठा असल्याने या धरणास कोणताही धोका नाही. त्याचबरोबर या धरणाच्या बाजूस नदी किनारी असणाऱ्या बुध्दवाडी, कातळवाडी, कोंडये, बाणेवाडी व नावतवाडी या गावांनाही सतर्क राहण्याबाबत आणि आवश्यक ती मदत करण्याबाबत स्थानिक प्रशासनाला सूचना देण्यात आली आहे. प्राधान्याने आणि जलदगतीने या धरणाच्या दुरुस्तीचे काम करण्याबाबत विभागाला सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. पावसाने आज विश्रांती घेतल्याने त्याचा लाभ उठवत सकाळपासूनच अश्मपटल दुरुस्तीच्या कामाला वेग आला आहे.