सावंतवाडी : प्रतिनिधी
साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा साहित्यवलय पुरस्कार २०२५ सोहळा ठाणे येथे होणार आहे. या सोहळ्यात विविध साहित्य प्रकारातील नामवंत लेखक-लेखिकांना सन्मानित केले जाणार आहे. यात सिंधुदुर्ग-सावंतवाडीच्या लेखिका कल्पना बांदेकर यांच्या ‘जपलाला कनवटीचा’ या काव्यसंग्रहाचा समावेश आहे. मनविसे आणि धृपद एंटरटेनमेंट यांच्यावतीने या पुरस्काराचे वितरण होणार आहे. पुरस्काराचे द्वितीय वर्ष असून महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आलेल्या ३५० पुस्तकांमधून लेखक निवड करण्यात आली आहे. हा सोहळा १० ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजता ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी-जोगळेकर असून साहित्यविश्वातील मान्यवर व मनसे नेत्यांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे.









