उचगाव : कल्लेहोळ ते माध्यमिक विद्यालय व कॉलेज या रस्त्याचे काम गावातील युवकांनी आणि ग्रामस्थांनी श्रमदानातून पूर्ण केले. गेल्या अनेक दिवसांपासून सदर रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक व इतर ग्रामस्थांतून करण्यात येत होती. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे पावसाळय़ात पाणी साचून डबकी निर्माण झाली होती. रस्त्यावरून ये-जा करणाऱया विद्यार्थ्यांना खराब रस्ता व पाण्याच्या डबक्याशी सामना करत कॉलेज गाठण्याची वेळ आली होती.
सदर रस्त्याची दुरुस्ती खडी, चिपिंग टाकून केल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर रस्ता गेल्या कित्येक दिवसांपासून अतिशय खराब झाला होता. ठिकठिकाणी खड्डे पडलेले होते. त्यामुळे पावसाचे पाणी त्यामध्ये साचत असल्याने बाजूला पाणी उडत होते. विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता. याठिकाणी कॉलेजसाठी बाहेरगावचे विद्यार्थी मोठय़ा प्रमाणात येत असतात. त्याची दखल घेऊन गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश नागोजीचे, पुंडलिक मरुचे, शिवाजी पाटील, नारायण राक्षे, जोतिबा कडेमनी, संजय हट्टीहोळी, कुमार लमाणी, बिर्जे खडी मशीन आदींनी चिपिंग देऊन मदत केली. तसेच गंगाराम पाटील, अरुण पाटील, विजय पाटील, लक्ष्मण वेताळ, चांगदेव वेताळ, उत्तम राक्षे, प्रमोद कडोलकर आदींनी या रस्त्याची डागडुजी केली. कामासाठी त्यांनी स्वतःचा ट्रक्टर आणून श्रमदान केले.









