…तर गुन्हेगारी वृत्तीला येईल ऊत
कुदनूर/ विनायक पाटील
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील नंदा नामदेव जोशी (वय ४९) या विधवा महिलेचा बुधवार दि. १९ रोजी रात्री संशयास्पद मृत्यू झाल्याची दूर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे सर्वच ग्रामस्थ अवाक झाले अन् संशयिताला तत्काळ जेरबंद करून दूर्दैवी कुटुंबाला न्याय द्यावा, अशी केविलवाणी हाक सर्वांकडून येऊ लागली. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्याने अन् धक्कादायक शवविच्छेदन अहवाल यामुळे पोलिसांच्या तपासावरच ग्रामस्थांकडून शंका उपस्थित केली जात आहे. पोलीस आणि तपास यंत्रणेने या प्रकरणाला न्याय नाही दिला तर गुन्हेगारी वृत्तीला ऊत येईल.
नंदा जोशी या बुधवारी पाहुण्यांच्या एका समारंभाहून सायंकाळी घरी आल्यानंतर तासाच त्यांच्यावर दूर्दैवी प्रसंग ओढावला. घराच्या मागील बाजुला गवतात त्या मृत अवस्थेत आढळल्या. मृतावस्थेत कानातील आणि गळ्यातील दागिना तुटलेला अन् शरिराशी झटापड झालेली होती. आई घरात नसल्याने तिचा मोठा मुलगा भरमूने शोधाशोध केली. शक्य होईल त्यांना फोनवरुन विचारणा केली. मात्र, अखेरीस घराच्या मागील बाजूस आईला त्या अवस्थेत पाहून त्याच्या पायाखालची जमीनच क्षणासाठी सरकली. तो ते सर्व पाहून ढसाढसा रडू लागला. त्यानंतर थोड्या वेळानंतर मन घट्ट करून घडलेल्या प्रकाराची माहिती आपल्या भावांसह शेजारी आणि पाहुण्यांना दिली. घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर आणि चंदगडचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह विच्छेदनानंतर कुटुंबाच्या ताब्यात दिला. पतीच्या निधनानंतर आर्थिक परिस्थिती बेताची असताना नंदा यांनी आपल्या चारही मुलांचा सांभाळ करुन घरचा जम बसविला होता. मात्र, सुखाचा घास मिळण्याच्या प्रसंगी दृष्टवृत्तीमुळे जोशी कुटुंबावर दूर्दैवी प्रसंग ओढावला.
वैद्यकीय अधिकार्यावरच गुन्हा दाखल करा
नंदा यांचा मृतदेह चंदगड येथे विच्छेदन करण्यात आला. शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल कळताच सर्वजण अवाक झाले. अहवालात हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे नमूद केले असल्याने अनेक तर्कविर्तक वर्तविले जात आहेत. हृदय विकारने जर मृत्यू झाला असता तर मृताच्या कानातील तसेच गळ्यातील दागिन्यांशी छेडछाड झालीच कशी? गळ्यावर तसेच शरिरावर कसे वर्ण उमटले? असे अनेक प्रश्न या अहवालामुळे चर्चेत आले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकार्यावरच गुन्हा दाखल करा, अशा मागणीद्वारे ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन महिला हक्क आयोग तसेच जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दिले आहे.
पैशांच्या जोरावर गुन्हेगार मोकाट
आठवडा होऊन गेला तरी अद्याप संशयित गुन्हेगाराला अटक करण्यात आली नाही. जोशी कुटुंबाकडून संशयित आरोपीचे नाव उघड केले गेले असून, गावकर्यांच्या तोंडूनही संशयित आरोपी उघड सांगितला जात आहे. घटना घडलेल्या दिवशी रात्री संशयित व्यसनमुक्ती केंद्रात दाखल होतो. व्यसनमुक्ती केंद्राच्या सुचनांमुळे पोलीस त्याला ताब्यात घेऊ शकत नाहीत. याशिवाय काही स्थानिक पुढार्यांकडून गुन्हेगारीला साथ दिली जात असल्याचा ग्रामस्थांकडून आरोप होत आहे. पैशांच्या जोरावर जर कारवाई टळत असेल तर गुन्हेगार मोकाट सुटतील. अन् असे गुन्हे दिवसागणिक घडत राहतील यात शंका नाही.









