अॅसिड हल्ला पीडितेवर आधारित सीरिज
विजय वर्मा आणि श्वेता त्रिपाठी यांची वेबसीरिज ‘कालकूट’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. ‘कालकूट’ ही सुमित सक्सेनाकडून दिग्दर्शित एक इन्व्हेस्टिगेटिव्ह सीरिज आहे. या सीरिजमध्ये विजय वर्मा पोलिसाची भूमिका साकारत आहे. तर अॅसिड हल्ला पीडितेला न्याय मिळवून देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका तो साकारत आहे.

या सीरिजमध्ये अॅसिड हल्ला पीडितेची भूमिका श्वेता त्रिपाठीने साकारली आहे. याच्या टेलरद्वारे लैंगिक भेदभाव, प्रशासकीय व्यवस्था आणि पीडितांसंबंधी पोलीस अधिकाऱ्यांचा दृष्टीकोन अत्यंत प्रभावीपणे दर्शविण्याता आला आहे. तसेच अॅसिड हल्ल्यासारख्या गंभीर गुन्ह्याकडे पोलीस-प्रशासन कशाप्रकारे पाहते यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. सीरिजचा ट्रेलर अंगावर शहारे आणणारा आहे. कालकूट ही सीरिज जियो सिनेमावर प्रदर्शित होणार आहे.
विजय वर्मा अलिकडेच लस्ट स्टोरीज 2 यात दिसून आला होता. यातील त्याच्या अभिनयाचे तसेच तमन्ना भाटियासोबतच्या जोडीचे कौतुक झाले होते. तर श्वेता त्रिपाठीने मिर्झापूर या वेबसीरिजमधील स्वत:च्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांची मने यापूर्वीच जिंकली आहेत. यामुळे दोघांनाही कालकूट या सीरिजमध्ये पाहणे प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे.









