पूर्वमेघात आपण रक्षावे मेघनाला अलका नगरीला जाण्याचे वर्णन पाहिले. तर उत्तरमेघात अलकानगरी, यक्षाचे घर, त्याची विरही स्त्री वगैरेंचे वर्णन, विरही माणसाच्या मनःस्थितीचे वर्णन इतके सुंदर रंगवले आहे की, ते सारे आपल्या मनःचक्षुंपुढे उभे राहते. त्याचप्रमाणे सर्व यांना पोषक अशा मंदाक्रांता वृत्तात रचले आहेत. मागील श्लोकात यक्ष मेघनाला आपल्याला ओळखण्याची खूण म्हणून त्या दोघांमध्ये घडलेला प्रणयप्रसंग वर्णन करतो. त्यावरून तो कुशल असल्याचे पत्नीने जाणावे असेही तो सांगतो. विरहामुळे स्नेहबंध अधिक दृढ होऊन जणू प्रेमाची रास तयार होते, असे तो सांगतो. हा संदेश सांगितल्यावर तिचा कुशल संदेश परत आणण्याबद्दल आर्जवतो.
आश्वास्यैव प्रथमविरहोदग्रशोकां सखींते
शैलादाशु त्रिनयनवृषोत्खातकूटानिवृत्तः।
साभिज्ञानप्रहितकुशलैस्तद्वचोभिर्मयापि
प्रातः कुन्दप्रसवशिथिलं जीवितं धारयेथाः।।
अर्थः- पहिल्याच विरहामुळे अतिशय दुःखी झालेल्या तुझ्या मैत्रिणीचे ह्याप्रमाणे समाधान करून, शंकराच्या नंदीने शिखरे विदारलेल्या पर्वताहून त्वरित परत फिरून खुणेसहित पाठवलेल्या कुशलवार्तेच्या तिच्या निरोपांनी माझादेखील, प्रांतःकालच्या कुंदसुमनांप्रमाणे दुर्बळ असा माझा जीव तगवून धर.
कित्येक फुले ही संध्याकाळी उमलतात आणि सकाळी प्रत्यक्षात दुर्बल झाल्यामुळे नंतर ती खाली गळून पडतात. कुंदाच्या फुलांचेही तसेच आहे. त्रिनयनवृषोत्खातकूटात् यातील त्रिनयन म्हणजे अर्थातच शंकर. ‘त्रिनयनस्य वृषभेण उत्खाता जीवितं अवदारिताः कूटाः शिखराणि यस्य तस्मात्।’ वृषभ म्हणजे नंदी. त्याने आपल्या शिंगांनी शिखरे जणू विदारून, उध्वस्त करून टाकली आहेत. आशु म्हणजे त्वरित. यानंतर आपण मेघाला सांगितलेले बंधूकार्य तो नक्कीच पूर्ण करील, अशी यक्ष अपेक्षा करतो.
कश्चित्सौम्य व्यवसितमिदं बन्धूकृत्यं त्वया मे
प्रत्यादेशशान्न खलु भवतो धीरतां कल्पयामि।
निःशब्दोएपि प्रदिशसि जलं याचितश्चातकेभ्यः
प्रत्युक्तं हि प्रणयिषु सतामीप्सतार्थक्रियैव।।
अर्थः- हे सौम्य (सज्जन), हे माझे बंधूकार्य तू करायचे ठरवले आहेस ना?
खरोखरच तुझे मौन नकारामुळे आहे असे मी समजत नाही. कारण याचना केली असता गर्जना न करताच तू चातकांना उदक देतोस. खरेच आहे, याचकांच्या बाबतीत त्यांचे इच्छित कार्य करणे हेच सत्पुरुषांचे त्यांना उत्तर असते.
‘प्रत्यादेश’ याचा अर्थ मल्लिनाथाप्रमाणे न घेता ‘नकार’ असा घेतला आहे. अशा प्रकारे यक्ष मेघाला प्रार्थनापूर्वक निरोप देतो.








