विविध नद्या, पर्वत मेघ ओलांडून जात असताना त्या सर्वांचे वर्णन करताना कालीदास त्यांची नावे आणि त्यामागील एखादा पौराणिक, धार्मिक कथा यांचा संदर्भही तो देतो. तसेच तिथल्या वनस्पती, कीटक, पशुपक्षी यांचीही माहिती तो सांगतो. मागील श्लोकात आपण चर्मण्वती नदीची, रन्तीदेव राजा वगैरेंची माहिती पाहिली.
त्वय्यादातुं जलमवनते शार्ङ्गिणो वर्णचौरे
तस्याः सिन्धोः पृथुमपि तनुं दूरभावात्मवाहम्।
प्रेक्षिष्यन्ते गगनगतयो नूनमावर्ज्य दृष्टी-
रेकं मुक्तागुणमिव भुवः स्थूलमध्येन्दनीलम्।।46।।
अर्थः- कृष्णाचा वर्ण चोरणारा तू जल घेण्याकरता (पिण्याकरता) खाली उतरलास म्हणजे त्या चर्मण्वती नदीचे रुंद असताही दूर अंतरामुळे अरुंद दिसणारे पात्र हे जणू भूमीच्या मध्यभागी इंद्रनील मण्याचे मोठे पदक असलेला एकेरी मोत्यांचा सर आहे असे समजून आकाशमार्गाने जाणारे सिद्धादि देवयोनीविशेष(यक्ष,गंधर्व इत्यादी) खरोखरच आपली दृष्टी रोखून पाहतील.
याचा थोडक्मयात अर्थ असा की, मेघ नदीवर उतरला म्हणजे आकाशात उंचावरून जाणाऱया गंधर्वादिकांना हा भूमीने कंठात घातलेला मोत्यांचा सर आहे की काय असा भास होऊन ते एकटक पाहतील असा भाव!
तामुत्तीर्य व्रज परिचितभ्रूलताविभ्रमाणां
पक्ष्मोक्षेपादुपरिविलसत्कृष्णशारप्रभाणाम्।
कुन्दक्षेपानुगमधुकरश्रीमुषामात्मबिम्बं
पात्रीकुर्वन्दशपुरवधूनेत्रकौतूहलानाम्।।47।।
अर्थः- त्या चर्मण्वती नदीला ओलांडून भ्रुकुटीविलास जाणणाऱया, पापण्या वर केल्याने चित्रविचित्र रंगाच्या प्रभा विलसत असलेल्या, कुंदपुष्पांच्या हेलकाव्यांबरोबर हेलकावे घेणाऱया भ्रमरांचे सौंदर्य चोरणाऱया दशपुरातील स्त्रियांच्या कुतूहलपूर्ण नेत्रकटाक्षांना स्वतःला पात्र करून पुढे घेत पुढे चालू लाग.
‘पात्रीकुर्वन्’- यक्ष मेघाला सांगतो की, तू असे रूप धारण कर की, ज्यामुळे दशपुरातील स्त्रिया तुझ्याकडे कौतुकाने पाहतील. ‘दशपुर’ म्हणजे हल्लीचे ‘मंडसोर’ किंवा ‘मंदसोर’ होय. हे जिह्याचे ठिकाण शिवणा नदीच्या उत्तर तीरावर वसलेले आहे. तेच रन्तीदेवाच्या राजधानीचे शहर होते.
ह्या श्लोकात उपमा आणि उदात्त अलंकार वापरला आहे.








