पूर्वी गजासुर नावाचा एक दैत्य खूप उन्मत्त होऊन देवादिकांना त्रास देऊ लागला. तेव्हा सर्वजण काशीविश्वेश्वराच्या देवळात शंकराच्या आश्रयाला आले. त्यांनी गजासुरापासून रक्षण करण्यासाठी शंकरांना गळ घातली. तेव्हा त्यांनी गजासुराला मारून त्याचे चामडे सोलले आणि आपल्या अंगावर पांघरले. त्यांनी तांडव नृत्य सुरू केले. या कथेचा संदर्भ पुढील श्लोकात आहे.
पश्चादुच्चैर्भुजतरुवनं मण्डलेनाभिलीनः
सान्ध्यं तेजः प्रतिनवजपापुष्परक्तं दधानेः।
नृत्यारम्भे हर पशुपतेरार्द्रनागाजिनेच्छां
शान्तोद्वेगस्तिमितनयनं दृष्टभक्तिर्भवान्या।।36।।
अर्थः- नंतर उंच बाहुरुपी तरुवन मंडलाकार व्यापून राहून, ताज्या जास्वंदीच्या फुलाप्रमाणे लाल असे सायंकालिन तेज धारण करून, पार्वती, भीती नष्ट झाल्याने अनिमिष नेत्रांनी तुझी दृढ भक्ती पहात असताना तू तांडवनृत्याच्या प्रारंभी शंकराची ओल्या गजचर्माची इच्छा नाहिशी कर.
शंकराने गजचर्माचे ओले कातडे पांघरताच पार्वती घाबरून गेली होती. तिने आपले डोळे मिटून घेतले. म्हणून यक्ष मेघाला सांगतो की, त्या चामडय़ाच्या जागी तूच रहा. त्यामुळे शंकराला गजचर्माची आठवण होणार नाही आणि पार्वतीलाही भीती वाटणार नाही. त्याच्यावरील भक्तीने ती त्याच्याकडे कौतुकाने पाहील. ‘भुजतरुवनम्’ शब्दाचा अर्थ भुजा(हात)रूपी तरुंचे वन. म्हणजे तांडव नृत्य करतेवेळी शंकरांनी दहा हात धारण केले होते. ते उंच केल्यामुळे, पसरल्यामुळे वनासारखा भास होत होता.
अशा प्रकारे यक्षाने मेघाला सेवेचा प्रकार सांगून पुन्हा नगरात संचार करण्याचा प्रकार कथन केला.
गच्छन्तीनां रमणवसतिं योषितां तत्र नक्तं
रुद्धालोके नरपतिपथे सूचिभेद्यैस्तमोभिः।
सौदामन्याकनकनिकषस्नग्धिया दर्शयोवीम्।
तोयोत्सरगस्तनितमुखरौ या स्म भूर्विक्लवास्ताः।।37।।
अर्थः- तिथे उज्जैनी शहरात रात्रीच्या वेळी आपल्या प्रियकराच्या वसतीस्थानाला जाणाऱया स्त्रियांचा, अतिशय दाट अशा काळोखाने राजमार्ग दिसेनासा केला असता, कसोटीवरील(सोने घासून पहाण्याचा दगड) सुवर्णरेखेप्रमाणे असणाऱया विजेने त्यांना मार्ग दाखव. पाऊस पाडून आणि गडगडाट करून गर्जना करू नकोस. कारण त्या भित्र्या असतात. मेघाचा रंग कसोटीच्या दगडाप्रमाणे काळा असल्याने तिथे निर्माण होणारी विजेची रेखा सोन्याच्या रेषेप्रमाणे दिसते.
योषिता म्हणजे अभिसारिका म्हणजेच प्रियकराला भेटायला जाणाऱया स्त्रिया.
ह्या श्लोकात ‘विषम’ अलंकार वापरलाय.









