यक्ष उज्जैनीचे वर्णन करण्यात गढून गेला आहे. उज्जैनी एक तीर्थक्षेत्र आहे. तिथे महाकालेश्वर मंदिर आहे. तिथे महाकालाचे महात्म्य सांगताना यक्ष मंदिरातील पूजाअर्चा आणि इतर गोष्टींचेही वर्णन करतो. तिथे मेघाला तो सूर्यास्तापर्यंत थांबायला सांगतो…
अप्यनस्मिञ्जलधर महाकालमासाद्य काले
स्थातव्यं ते नयनविषयं यावदत्येति भानुः।
कुर्वन्संध्याबलिपटहतां शूलिनः श्लाघनीया-
मामन्दाणां फलमविकलं लप्स्यसे गर्जितानाम्।।34।।
अर्थः- हे मेघा, तू महाकालेश्वरिं तू अवेळी जाऊन पोचलास तरी, तिथे सूर्यास्त होईपर्यंत थांब. तिथून निघण्याची घाई करू नकोस. कारण प्रदोषसमयी शंकराची पूजा होत असते. त्यावेळी तू गंभीर गर्जना केलीस तर तुला पूजासमयीचा चौघडा वाजवण्याचे फळ लाभेल. म्हणजेच तुझ्या गडगडण्याचे सार्थक होईल.
वरील श्लोकात ‘शूलिन्’ म्हणजे शंकर. हाती त्रिशूळ असलेला म्हणून शूलिन्! ‘बलिपटहताम्’ म्हणजे संध्याकाळच्या पूजेच्या वेळी केलेले चौघडावादन. ‘आमन्द’ म्हणजे थोडेसे गंभीर…असे काही शब्द वापरलेत.
पुढील श्लोकात यक्ष मेघाला महाकालमंदिरात चौघडा वादनाच्या वेळी वारांगनांच्या नृत्याचे वर्णन करतो.
पादन्यासैः क्वणितरशनास्तत्र लीलावधूतै
रत्नच्छायाखचितवलिभिश्चामरैः क्लान्तहस्ताः।
वेश्यास्त्वत्तो नखपदसुखान्प्राप्य वर्षाग्रबिन्दू-
नामोक्ष्यन्ते त्वयि मधुकरश्रेणिदीर्घाकटाक्षान।।35।।
अर्थः- तिथे त्यावेळी पदन्यासामुळे ज्यांचे कमरपट्टे वाजत आहेत,(कमरपट्टय़ांच्या घागऱया वाजत आहेत), लीलया हलवित आहेत, रत्नांच्या तेजाने तेजःपुंज झालेले दांडे असलेल्या चवऱयांच्या योगाने ज्यांचे हात दमून गेले आहेत अशा वारांगना, तुझ्याकडून नखांच्या ओरखडय़ांना सुखकर वाटणारे पहिल्या पावसाचे थेंब मिळाले, म्हणजे तुझ्याकडे भ्रमरांच्या पंक्तिंप्रमाणे लांब असलेले कटाक्ष फेकतील.
त्याकाळात महाकालेश्वरासमोर वारांगना नृत्य करीत असत. त्यांच्या नेत्रकटाक्षांचे आणि कमनीय नृत्याचे वर्णन ह्या श्लोकात आले आहे. तसेच ‘रत्नच्छायाखचितवलिभिः’ ह्या शब्दाबद्दल टीकाकारांच्यात मतभेद आहेत. कोणी म्हणतात रत्नच्छाया म्हणजे वेश्यांच्या हातातील रत्नजडित कंकणांची छाया, तर कोणी म्हणतात चवरीच्या दांडय़ांना जडवलेल्या रत्नांची छाया. खरे काय ते ठरवणे कठिण आहे!








