एकास गंभीर दुखापत, परस्पर विरोधी तक्रारी दाखल
वार्ताहर/ मायणी
शेजारी राहणाऱया महिलेस पाणी का भरून दिले नाही या कारणावरून दोन कुटुंबातील वाद विकोपाला जाऊन त्यांच्यामध्ये झालेल्या वादावादीत दोघांवर तलवारीने हल्ला केल्याची घटना दि. 20 रोजी सायंकाळी 5 च्या सुमारास कलेढोण येथील बाजार चौक परिसरात असलेल्या मशिदी जवळ घडली. या घटनेत एकास गंभीर दुखापत झाली असून संबंधितांनी परस्परविरोधी तक्रारी दाखल केल्या आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सदर मशिदी बाहेरील नळावर शेजारील महिला पाणी भरण्यासाठी गेली असता सबंधित महिलेला पाणी भरू न दिल्याच्या कारणावरून फारुख व दिलावर शिकलगार व त्यांच्या शेजारील असलेल्या बाळू उर्फ लतिफ शिकलगार यांच्यामध्ये वाद होऊन या वादातून फारुख शिकलगार यांच्यावर हतिम लतिफ शिकलगार याने धारधार तलवारीने हल्ला केला. यात फारुख शिकलगार यास किरकोळ दुखापत झाली
हा वाद झाल्याची माहिती फारुख यांनी त्यांचे बंधू हारूण यांना कळवले असता हारूण शिकलगार याने बाळू शिकलगार यांना मारहाण का केली याचा जाब विचारत केसाला धरून ओढले. यानंतर वाद आणखी विकोपाला जाऊन बाळू व हतीम शिकलगार याने हारूण शिकलगार यांच्यावर तलवारीने व कुऱहाडीने हल्ला केला. सदर हल्ल्यात हारूण यांना डोक्यास तलवार लागून गंभीर दुखापत झाली. याघटनेनंतर संबंधितांनी एकमेका विरोधात वडूज पोलीस ठाणे येथे तक्रारी दाखल केल्या आहेत.
या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश देशमुख व वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मालोजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर या तपास करत आहेत. यामध्ये एका आरोपीस अटक केली असून एक जण फरार आहे.









