काळम्मावाडी थेटपाईपलाईन योजनेच्या कामातील अडथळे दूर, काम अंतिम टप्प्यात, प्रदूषित पाण्यापासून सुटका, शहराला शुद्ध-मुबलक पाणी मिळणार
विनोद सावंत कोल्हापूर
काळम्मावाडी धरणातून कोल्हापूर शहराला थेटपाईपलाईनेने पाणी मिळावे यासाठी शहरवासियांनी आंदोलन केले. रामचंद्र फाळके यांनी महापौरपदाचा राजीनामा दिला. आमदार सतेज पाटील यांनी तर आमदारकीच पणाला लावली. यानंतर थेटपाईपलाईनसाठी निधी मिळाला. प्रत्यक्ष कामही सुरू झाले. कामातील सर्व अडथळे दूर झाले असून अंतिम टप्प्यावर आहे. यामुळे शहरवासियांच्या थेटपाईपलाईनचे 45 वर्षाचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.
वास्तविक काळम्मावाडी धरणातून 53 किलोमीटरवरून पाणी आणणे हे कोल्हापुरात बसून सोपे वाटत असले तरी प्रत्यक्षात धरणक्षेत्रातून पाईपलाईन आणणे आव्हान होते. जॅकवेलचे काम 150 फुट खाली जाऊन करावे लागले. उन, वारा, पावसामध्ये येथे काम करणे सोपे नव्हते. शिवाय मातीचे ढिग कोसळत असताना कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालून काम करावे लागले. असे अनेक संकटे पार करत आता काम पूर्णत्वाकडे आले आहे. ठेकेदार, मनपाने 94 टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला आहे. पुढील दोन ते तीन महिन्यांत शहराला थेटपाईपलाईनने पाणी मिळणार असून दिवाळी पूर्वीच काळम्मावाडीच्या पाण्याचे अभ्यंस्नान होणार, अशी स्थिती आहे.
सद्या शिंगणापूर, बालिंगा आणि नागदेववाडी येथील नदी काठातून पाणी उपसा करून पुईखडी येथील जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करून शहरात दिले जाते. दरम्यान, कारखान्यासह लगतच्या 39 गावातील सांडपाणी नदीत मिसळते. यामुळेच काळम्मावाडी धरणातूनच शहरात थेट पाणी येणार असल्याने प्रदूषणाचा विषयच संपणार आहे.
योजनेची सद्यस्थिती
काम पूर्ण : इनटेक वेल, इन्स्फेक्शन वेल एक. इन्स्फेक्शन वेल दोन, 15 लाख क्षमतेचे ब्रेक प्रेशर टँक, पुईखडी येथे 80 एमएलडीचे जलशुद्धीकरण केंद्र
अंतिम टप्प्यात असलेली कामे
जॅकवेल 1 – पंपिंग हाऊसचे स्लॅब टाकून पूर्ण, उपसा पंप जोडणे सुरू
जॅकवेल 2 – जॅकवेल पूर्ण पंपिग हाऊसचा काम सुरू
पाईपलाईन -53 किलोमीटर पैकी 30 मीटर शिल्लक
बिद्री ते जॅकवेल विद्युतलाईन – 27 किलोमीटरपैकी 23 किलोमीटर पूर्ण
स्काडा यंत्रणा – पुईखडीतील काम पूर्ण, धरण क्षेत्रातील काम अपूर्ण
पाईपलाईन – हायड्रोलिक टेस्टिंग पूर्ण, 22 किलोमीटर वॉटर टेस्टिंग पूर्ण
धरणाने तळ गाठला तरी पाणी मिळणार
काळम्मावडी धरणातील डेथ स्टॉक 607.50 मीटरवर आहे. तर थेटपाईपलाईनचे धरणातील पाईपलाईन 608.50 मीटरवर जोडली आहे. गेल्या 30 वर्षातील धरणातील साठ्याची माहिती घेऊनच पाईपलाईन टाकली असून धरणातील तळ गाठला तरी शहराला पाणी मिळणार असल्याचा दावा केला जात आहे.
10 लाख लोकसंख्येला पुरेल इतके पाणी
महापालिकेने थेटपाईपलाईन योजनेचे काम करताना 2045 पर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून प्रकल्प उभारला आहे. सद्या 6 लाख लोकसंख्या असून 10 लाख 29 हजार नागरीकांची पाण्याची सोय होणार आहे.
तासाला 72 हजार लिटर पाणी उपसा
थेटपाईपलाईन योजनेतील जॅकवेलमध्ये 940 एचपीचे 4 उपसा पंप बसविले जाणार आहेत. यामध्ये 3 उपसा पंप कार्यन्वीत राहणार असून 1 पंप स्टँडबाय ठेवला जाणार आहे. तीन उपसा पंपातून तासाला 72 हजार लिटर उपसा होणार आहे. शहरात रोज 160 एमएलडी पाण्याचा उपसा होत आहे. थेटपाईपलाईन योजनेमुळे 238 एमएलडीपर्यंत पाणी उपसा करता येणार आहे.
सतेज पाटील यांनी करून दाखविले
आठ वर्षापूर्वी महापालिका निवडणूक प्रचार सभेत आमदार सतेज पाटील यांनी थेट पाइपलाईन योजनेला मंजूरी आणू अन्यथा मी आमदारकी लढवणार नाही, असे जाहीर केले. त्यानंतर आमदार पाटील यांच्या प्रयत्नानंतर 488 कोटी निधी मंजूर झाला. यानंतर प्रत्येक अडचणीवर त्यांनी मार्ग काढला. दिलेल्या शब्द पाळत त्यांनी विरोधकांना करून दाखविले.