कळंबा :
कळंबा गावच्या ग्रामदैवत श्री महालक्ष्मी अंबाबाई देवीची वार्षिक यात्रा मंगळवारी (दि. 13 मे) अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. गेल्या आठ दिवसांपासून सुरु असलेल्या या यात्रोत्सवाचा समारोप महाप्रसादाने झाला. हजारो भाविकांच्या उपस्थितीत देवीच्या अन्नपूर्णारूप अलंकारिक पूजेसह विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
यात्रेच्या दिवशी सकाळी मंदिरात पारंपरिक दुग्धाभिषेक करून देवीची अन्नपूर्णा स्वरूपातील अलंकारिक पूजा बांधण्यात आली. ही भव्य पूजा श्रीपूजक आराध्य गुरव, मंथन गुरव, हर्षद गुरव, सागर गुरव, मोहन गुरव, महेश गुरव, गोविंद गुरव, प्रवीण गुरव, भिकाजी गुरव यांनी अत्यंत भक्तिभावाने केली.
त्यानंतर सकाळी 11 वाजता महाप्रसादास प्रारंभ झाला. सरपंच सुमन गुरव यांच्या हस्ते व माजी सरपंच सागर भोगम, विश्वास गुरव अरुण टोपकर, शशिकांत तिवले, प्रकाश कदम, बाजीराव पोवार, भारत पाटील, भगवान पाटील, श्रीकांत पाटील, संदीप पाटील, संग्राम जाधव, अजित पाटील, अजित तिवले कळंबा ग्रामपंचायतीचे आजी–माजी सदस्य आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाप्रसाद सुरू करण्यात आला. यावेळी सुमारे बारा ते पंधरा हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यात्रेच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही धार्मिक वातावरणात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. कात्यायनी आणि हनुमान भेट, होम–हवन यांसारखे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. याशिवाय महालक्ष्मी मंदिर समिती आणि गावातील मंडळांकडून भव्य स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात्रेच्या काळात कळंबा गावात जिल्हाभरातून भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. यात्रेचे सुरळीत आयोजन व व्यवस्थापन करण्यासाठी अंबाबाई भक्तगण मंडळ, कळंबा ग्रामपंचायत, महालक्ष्मी भक्तमंडळ व यात्रा कमिटी करवीर पोलीस यांनी विशेष परिश्रम घेतले.
यात्रेच्या पार्श्वभूमीवर ‘दै. तरुण भारत‘च्या संवाद विशेष पुरवणीचे प्रकाशनही करण्यात आले. या कार्यक्रमास गोकुळचे माजी चेअरमन विश्वास नारायण पाटील, माजी सरपंच सागर भोगम, विश्वास गुरव, अरुण टोपकर, अजित पाटील, बाळासाहेब खडके, बाजीराव पोवार, शिवाजी निकम, भारत पाटील, दीपक तिवले, संग्राम जाधव, सुधीर पाटील, संभाजी बावडेकर, बाजीराव पाटील, संदीप पाटील, अनिल सोलापूरे, अजित तिवले, राजू तिवले आदी मान्यवर उपस्थित होते.








