कोट्यावधींचा चुराडा, तरीही दुर्दशा कायम!
कळंबा / सागर पाटील :
कोल्हापूर शहराचा पाण्याचा कणा आणि ऐतिहासिक वारसा असलेला कळंबा तलाव सध्या महापालिकेच्या उदासीन कारभारामुळे संकटात सापडला आहे. गेल्या काही वर्षांत तलावाच्या तटबंदीच्या मजबुतीकरणासाठी सात कोटी 75 लाखांहून अधिक रुपये खर्च झाले, तरीही निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे तटबंदी वारंवार भेगा पडत आहे आणि काही ठिकाणी खचत चालली आहे. 2016 पासून तीनदा केलेल्या पिचिंगच्या कामांचा दर्जा उघड झाला असून, नुकत्याच झालेल्या पावसामुळे तटबंदीचा पश्चिम भाग खचल्याने तलावाला धोका निर्माण झाला आहे. तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट आणि दर्जेदार दुरुस्तीची मागणी नागरिकांतून जोर धरत असताना, महापालिकेच्या उदासीनतेमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि असंतोष वाढत आहे.
- तटबंदीच्या दुरुस्तीचा तीन वेळा खर्च
कळंबा तलावाच्या तटबंदीच्या मजबुतीकरणासाठी 2016 मध्ये 7 कोटी 75 लाखांचा निधी मंजूर झाला होता. यातून पिचिंग आणि तलाव परिसराचे सुशोभीकरण हाती घेण्यात आले. मात्र, पहिल्याच पावसाळ्यात निकृष्ट कामामुळे तटबंदीचा काही भाग खचला. मार्च 2017 मध्ये दुस्रया टप्प्यातील मजबुतीकरणाचे काम सुरू झाले, पण मुरुमात दगड रोवण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे हे कामही टिकले नाही. नोव्हेंबर 2017 मध्ये तिस्रयांदा पिचिंगचे काम हाती घेण्यात आले. यावेळी निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे तटबंदी पुन्हा कमकुवत ठरली. तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी कामाची पाहणी करून ठेकेदाराची बिले अदा न करण्याचे आदेश दिले. परिणामी, ठेकेदाराने काम अर्धवट सोडून पलायन केले. गेल्या वर्षी नव्याने निधी उपलब्ध झाला असला, तरी तटबंदीच्या मजबुतीकरणाचा प्रश्न कायम आहे.
- गलथान कारभार आणि कोट्यावधींचा चुराडा
कळंबा तलावाच्या सुशोभीकरण आणि मजबुतीकरणासाठी कोट्यावधी रुपये खर्च झाले, पण महापालिकेने कामाच्या देखरेखीसाठी सक्षम यंत्रणा उभारली नाही. तिस्रया टप्प्यातील पिचिंगच्या कामासाठी पाटबंधारे विभागातील निवृत्त अधिक्रायाची नियुक्ती झाली, पण त्यांच्याकडूनही दर्जेदार कामाची खातरजमा झाली नाही. चुकीच्या पद्धतीने उभारलेला एंट्रन्स प्लाझा, लाखो रुपये खर्चून बांधलेला जनावरं धुण्याचा हौद जो आता कचरावेचकांचा अड्डा बनला आहे, तसेच स्वच्छतागृह, पथदिवे आणि देखभालीसाठी कर्मच्रायांच्या अभावामुळे सुशोभीकरणाची योजना हास्यास्पद ठरली आहे. या गलथान कारभारामुळे कोट्यावधी रुपयांचा फटका बसला असून, तलावाची दुर्दशा कायम आहे.
- स्ट्रक्चरल ऑडिटची तातडीची गरज
स्ट्रक्चरल ऑडिट ही बांधकामाच्या संरचनेची सखोल तांत्रिक तपासणी आहे, ज्यामध्ये तटबंदीतील क्रॅक, मातीचा घटक, पाण्याचा झिरपप्रवाह आणि दगडी रचनेची टिकाऊपणा तपासला जातो. जुन्या तलावांच्या तटबंद्या पाण्याच्या दाबामुळे कमकुवत होतात. कळंबा तलावासारख्या ऐतिहासिक जलसाठ्यांचे नियमित ऑडिट आणि दुरुस्ती आवश्यक आहे. सध्या तलावाच्या पश्चिम बाजूस खचलेला भाग पाहता तातडीने स्ट्रक्चरल ऑडिटची गरज आहे, अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

- नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण
कळंबा तलावालगतच्या वस्त्यांमध्ये राहणारे नागरिक, विशेषत: कळंबा ग्रामस्थ, पावसाळ्यात सतत भीतीच्या छायेत वावरतात. तलाव पूर्ण भरल्यास आणि तटबंदी खचली तर जीवितहानीसह आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. गेल्या दोन वर्षांपासून तटबंदीतील कमकुवतपणा आणि दगड निखळण्याच्या घटनांबाबत नागरिकांनी ग्रामपंचायतीसह महापालिकेकडे तक्रारी केल्या, पण जलपुरवठा विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात जबाबदारी ढकलण्याचा खेळ सुरू आहे. 2021 मध्ये तलावाच्या गाळ काढणीचे आणि परिसर स्वच्छतेचे काही काम झाले, पण तटबंदीच्या संरचनात्मक दुरुस्तीकडे लक्ष दिले गेले नाही.
- ऐतिहासिक वारसा धोक्यात
1885 शाहु कालीन बांधलेला कळंबा तलाव हा कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याचा आणि पर्यावरणीय समतोलाचा आधार आहे. दगडी तटबंदी, सांडवा आणि पंपिंग स्टेशन यासारख्या त्या काळातील प्रगत तंत्रज्ञानाने बांधलेला हा तलाव आजही शहराच्या गरजा पूर्ण करतो. मात्र, गेल्या काही दशकांपासून देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने हा ऐतिहासिक वारसा संकटात सापडला आहे. तटबंदीच्या कमकुवतपणामुळे पावसाळ्यात तलाव पूर्ण भरल्यास पाण्याचा दाब वाढून तटबंदी आणखी खचण्याचा धोका आहे. अशा परिस्थितीत तलावालगतच्या वस्त्यांमध्ये मोठी जीवित आणि वित्तहानी होऊ शकते.
- प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची तलावाबाबत उदासीनता
कळंबा तलावाच्या समस्येचे गांभीर्य स्थानिक आमदार, खासदार, कळंबा ग्रामपंचायत, कोल्हापूर महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांना आहे, पण ठोस पावले उचलली जात नाहीत. महापालिकेकडून तात्पुरत्या दुरुस्तीचे आश्वासन दिले जाते, पण नागरिकांचा आग्रह आहे की, तात्पुरत्या उपायांनी हा प्रश्न सुटणार नाही. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी स्वतंत्र निधी, तज्ञ संस्थेची नियुक्ती आणि काटेकोर देखरेख आवश्यक आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव यामुळे तलावाची दुर्दशा वाढत आहे.
- उपाययोजना काय?
कळंबा तलावाच्या संकटावर मात करण्यासाठी खालील उपाययोजना तातडीने करणे गरजेचे आहे
तात्काळ स्ट्रक्चरल ऑडिट: तलावाच्या तटबंदीचे सखोल तांत्रिक मूल्यांकन करण्यासाठी तज्ञ संस्था नेमावी.
दर्जेदार पिचिंग: खोबणीचे दगड आणि आधुनिक तंत्रज्ञान वापरून तटबंदी बळकट करावी.
निधी आणि देखरेख: मजबुतीकरणासाठी स्वतंत्र निधी मंजूर करून काटेकोर देखरेख करावी.
आपत्ती व्यवस्थापन योजना: तलावालगतच्या वस्त्यांसाठी आपत्ती व्यवस्थापन योजना तयार करावी.
तलाव संरक्षण समिती: स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांना सामील करून तलाव संरक्षण समिती स्थापन करावी.
- प्रशासनाने जागे व्हावे
कळंबा तलावाच्या तटबंदीचा प्रश्न हा केवळ बांधकामाचा नाही, तर कोल्हापूरच्या सुरक्षिततेचा आणि ऐतिहासिक गौरवाचा प्रश्न आहे. कोट्यावधी रुपये खर्चूनही तलावाची दुर्दशा कायम असल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. आता तरी प्रशासनाने जागे होऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
कळंबा गावसह कोल्हापूर शहराचा पाणीपुरवठ्याचा कणा असलेल्या कळंबा तलावाच्या तटबंदीची दुरवस्था आणि महापालिकेच्या गलथान कारभारावर गेल्या काही वर्षांत तटबंदीच्या मजबुतीकरणासाठी सात कोटी 75 लाखांहून अधिक रुपये खर्च झाले, तरीही निकृष्ट कामामुळे तटबंदी खचत चालली आहे. पावसाळ्यात पश्चिम बाजूस खचलेल्या भागामुळे कळंबा ग्रामस्थांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
-सागर भोगम, माजी सरपंच कळंबा








