पाण्याचे प्रदूषण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय
कोल्हापूर : ‘स्वच्छता ही सेवा‘ अभियानाचा डंका जिल्हाभरात वाजत असताना कोल्हापूर शहरालगतच्या कळंबा तलाव परिसरात कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेला हा कळंबा तलाव प्लास्टिक, टाकाऊ वस्तू आणि अन्न अवशेषांनी भरला आहे. यामुळे पाण्याचे प्रदूषण वाढले असून, नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
महापालिका आणि कळंबा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे तलाव कचऱ्याच्या जाळ्यात अडकला आहे. जिल्हा प्रशासन, महापालिका, ग्रामपंचायती आणि पंचायत समित्यांनी ‘स्वच्छता ही सेवा‘ पंधरवडा मोठ्या थाटामाटात साजरा करण्याचे जाहीर केले आहे.
तलाव आणि पाणवठे स्वच्छ ठेवण्याचे आवाहन करत विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. मात्र, शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कळंबा तलावाची दयनीय अवस्था पाहता हे सर्व दावे केवळ कागदावरच राहिल्याचे दिसते. तलाव परिसरात दररोज कचऱ्याची भर पडत असून, ‘स्वच्छता अभियान‘च्या नावाखाली केवळ दिखाऊपणा सुरू आहे, अशी नागरिकांतून चर्चा होत आहे.
शहरासह कळंबा आणि पाचगाव परिसरासाठी हा तलाव अत्यंत महत्त्वाचा आहे. पाणीटंचाईच्या काळात याच तलावातून पाणीपुरवठा होतो. आज ही कळंबा गावाला या तलावातून पाणी पिण्यासाठी वापरले जाणारे हे पाणी आता प्रदूषणामुळे धोकादायक बनले आहे. तलावात प्लास्टिक पिशव्या, टाकाऊ साहित्य आणि समारंभातील शिल्लक अन्न थेट तलावात फेकले जात आहे.
पाचगाव ते कळंबा रस्त्यालगत आणि अॅग्रो फार्म्सकडे जाणाऱ्या मार्गावर कचऱ्याचे ढीग वाढत आहेत. महापालिका, कळंबा आणि पाचगाव ग्रामपंचायतींकडून कचरा उचलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. या कचऱ्यामुळे तलावातील जलचर प्राण्यांचा हानी होण्याची भीती आहे. तलावालगतच्या रस्त्यांवर चहा टपऱ्या, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि व्यावसायिक दुकानांमधून निर्माण होणारा कचरा थेट रस्त्याकडेला टाकला जातो. यावर कोणतेही नियंत्रण नाही, परिणामी पर्यावरणाची हानी होत आहे.
येथील नागरिकांनी पर्यावरणप्रेमींनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी नियमित साफसफाई आणि कचरा संकलन यंत्रणा उभी करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेने व कळंबा ग्रामपंचायतीने तातडीने कचरा हटवून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी, असे मत व्यक्त होत आहे. अन्यथा, हा तलाव कायमचा प्रदूषित होण्याची शक्यता आहे. खऱ्या अर्थाने स्वच्छता अभियान राबवल्यासच कळंबा तलावाचे मूळ स्वरूप परत मिळू शकेल.
“कळंबा तलाव कचऱ्याने ग्रासला आहे. शहरात आणि गावात ‘स्वच्छता ही सेवा‘ अभियान फक्त नावापुरतं आहे. महापालिका आणि ग्रामपंचायत कचरा उचलत नाहीत. तलाव परिसरात स्वच्छता मोहिमा झाल्या, येथील कचरा तलाव जैसे थे आहे. कचरा टाकणाऱ्यांवर दंड आणि नियमित साफसफाई झाली पाहजे.”
- प्रवीण शिंदे, कळंबा रहिवासी
“तलावातील प्लास्टिक आणि सांडपाण्यामुळे जलचर आणि आरोग्य धोक्यात आले आहे. रंकाळा तलाव सह कोटी तीर्थ तलाव यांसाठी कोटीचे निधी मंजूर करून पावले उचलली गेली, पण कळंब्याकडे दुर्लक्ष का? स्वच्छता अभियानाचा दिखाऊपणा थांबवून कचरा व्यवस्थापन आणि दंडात्मक कारवाई हवी.”
- संग्राम जाधव, कळंबा तलाव बचाव कृती, समिती सदस्य








