शतकोत्तर दिलासा देणारा तलाव
कळंबा / सागर पाटील :
कोल्हापूर शहराचा इतिहास, संस्कृती आणि स्वच्छ नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचाव्यवस्थापन यांचे संगमस्थळ ठरलेला कळंबा तलावाला 142 वर्षे पूर्ण झाले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांच्या दूरदृष्टीतून 1883 साली पूर्णत्वास आलेल्या या जलस्रोताने कोल्हापूरच्या तहानलेल्या जनतेला अनेक दशके जीवदान दिले. संकटाचा काळ असो, पुरपरिस्थिती असो की कोरोनासारखी महाभयंकर साथ या तलावाने कधीही पाठ फिरवली नाही. आज आधुनिक काळात जरी अनेक जलस्रोत उभे राहत असले, तरी इतिहासाचा साक्षीदार असलेला कळंबा तलाव अजूनही आपले महत्त्व सिद्ध करत आहे. कळंबा गावसह कोल्हापूर शहराची तहान भागवण्राया या ऐतिहासिक कळंबा तलावाला 142 वर्ष पूर्ण झाली आहेत.
कोल्हापूर शहराच्या दक्षिणेला छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांनी कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी बांधलेल्या कळंबा तलावातून स्वातंत्र्यानंतरही शहरास (सायफन) गुरुत्वीय बलाने पाणीपुरवठा सुरू होता ; परंतु काळाच्या ओघात बंद पडलेल्या या थेट पाणीपुरवठ्यानंतर कळंबा तलावातून शहराचा काही उपनगरांसह कळंबा आणि पाचगाव या दोन्ही गावांना पाणीपुरवठा होऊ लागला. या तलावाच्या निर्मितीस छत्रपती चौथे शिवाजी महाराजांनी 21 मार्च 1881 रोजी सुरुवात करून 1 जुलै 1883 रोजी बांधकाम पूर्ण केले . या तलावाची जागा तलाव बांधण्यासाठी मेजर ई. स्मिथ (रॉयल इंजिनिअर) यांनी जागेची पाहणी करून ती निश्चित केली. याचवेळी श्रीमंत जयसिंगराव आबासाहेब (कागल संस्थानचे अधिपती) यांनी राज्य प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता. आर. जे. शॅनन फस्कायर (सिव्हिल इंजिनिअर) यांनी या तलावाचे संकल्पनात्मक नियोजन केले. असिस्टंट इंजिनिअर रघुनाथ रामचंद्र शिरगावकर यांनी देखरेख केली.

- तलावाचे स्थापत्य सौंदर्य आणि तांत्रिक वैशिष्ट्ये
कळंबा तलावाची रचना आणि स्थापत्यशास्त्राrय बांधणी ही त्या काळातही आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून केली गेली होती. 19व्या शतकात सायफन तंत्रज्ञानाचा वापर करून शहरातील पाणीप्रवाह नियंत्रीत केला जात होता. तलावातून येणारे पाणी नैसर्गिक उताराच्या साह्याने शहरात पोहोचत होते. यासाठी कोणतीही मोटार वा विजेची गरज नव्हती, हे त्यावेळच्या जलनियोजन कौशल्याचे प्रतीक आहे. कळंबा तलावात सुमारे 50 एकर क्षेत्रफळ असून, साठवण क्षमता लाखो लिटरमध्ये मोजली जाते. तलावाच्या आजूबाजूचा परिसर हिरवाईने वेढलेला आहे आणि तो जैवविविधतेच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे.
- स्वातंत्र्यानंतरही कायम उपयोगी
स्वातंत्र्यानंतर काही काळापर्यंत कळंबा तलावातून सायफन प्रणालीद्वारे शहराचा पाणीपुरवठा सुरू होता. नंतर तांत्रिक कारणास्तव ही प्रणाली बंद झाली, परंतु आजही या तलावातून कळंबा, पाचगाव व काही उपनगरांमध्ये पाणीपुरवठा केला जातो. कोल्हापूर शहरातील काही भागाला दररोज हजारो लिटर पाणी तलावातून शहरात वितरीत केले जाते. विशेषत? उन्हाळ्याच्या काळात इतर स्रोत कोरडे पडले तरी कळंबा तलावाचे पाणी नागरिकांना दिलासा देते.
- संकटाच्या काळात खंबीर साथ
2019 सालचा महापूर असो वा 2020 मधील कोरोना काळ, या दोन्ही संकटांमध्ये अनेक पाणीपुरवठा योजनांवर ताण पडला होता. त्या काळात कळंबा तलाव हा एकमेव स्थिर व शाश्वत स्रोत ठरला. अनेक भागांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करावा लागत होता, मात्र तलावाच्या भागातील नागरिक त्यामानाने सुरक्षित होते.

- सध्याची आव्हाने
तलावाची सध्याची स्थिती पाहता, अनेक समस्या डोके वर काढत आहेत. तलावाच्या तटबंदीची अवस्था बिकट झाली आहे. काही ठिकाणी दगडी पिचिंग निखळले आहे. तलाव परिसरात प्लास्टिक कचरा, बांधकामे, अतिक्रमण वाढू लागले आहेत. यामुळे तलावाच्या जलधारण क्षमतेवर आणि स्वच्छतेवर परिणाम होत आहे. नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी या समस्यांकडे वेळोवेळी लक्ष वेधले आहे.
- भविष्यासाठी सुचवलेली दिशा
तलावाच्या तटबंदीचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून दुरुस्ती हवी.
तलावाच्या आजूबाजूला प्लास्टिकमुक्त झोन घोषित करावा.
जैवविविधतेच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्र म्हणून अधिसूचित करावे.
तलावातील गाळ सफाईसाठी वार्षिक नियोजन हवे.
शाळा, महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना तलावाचे ऐतिहासिक आणि वैज्ञानिक महत्त्व शिकवले जावे.
पर्यटनाच्या दृष्टीने तलावाच्या परिसरात बोटिंग, निसर्ग पर्यटन, पक्षी निरीक्षण यांसारख्या उपक्रमांचा विचार करता येऊ शकतो.
- लोकसहभागाची गरज
केवळ प्रशासन नव्हे, तर नागरिक, सामाजिक संस्था, पर्यावरण संस्था आणि इतिहासप्रेमींनी एकत्र येऊन या ऐतिहासिक ठेव्याचे रक्षण करणे हे काळाचे गरज आहे. शेकडो वर्षांपूर्वी एका दूरदृष्टी असलेल्या राजाने हे स्वप्न पाहिले आणि आज कळंबा गावसह कोल्हापूर शहरातील नागरिक त्याचा लाभ घेत आहोत, तर पुढच्या पिढ्यांसाठी ते जपणे आपली जबाबदारी आहे.
कळंबा तलाव म्हणजे केवळ जलसाठा नाही, तर कोल्हापूरच्या ऐतिहासिक, स्थापत्यशास्त्राrय आणि पर्यावरणीय वारशाचा भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराज (चौथे) यांची ही दूरदृष्टी आजही कोल्हापूरच्या प्रत्येक थेंबामध्ये अनुभवता येते. त्यामुळे या ठेव्याच्या संवर्धनासाठी सर्वसामान्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.








