कळंबा / सागर पाटील :
निसर्गरम्य वातावरण, ऐतिहासिक मनोरा आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचे प्रतीक असलेला कळंबा तलाव सध्या प्रशासकीय उदासीनतेमुळे उपेक्षित आहे. गेल्या 11 वर्षांपासून सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ घोषणा, निधी मंजुरी आणि अपूर्ण कामांचा खेळ सुरू आहे. संथ कामांचा वेग आणि नियोजनशून्य कारभारामुळे कोल्हापूरकरांचा विश्वास डळमळीत झाला आहे.
- काम न करण्याची परंपरा
2014 मध्ये कळंबा तलावाच्या सुशोभीकरणासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर झाला. मात्र, थकीत बिलं, नियोजनाचा अभाव आणि चुकीच्या पद्धतीने केलेली कामे यामुळे ही योजना अपूर्ण राहिली. 2024 मध्ये माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीमार्फत साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला. पण निविदा प्रक्रियेत विलंब आणि काही प्राथमिक कामांनंतर प्रकल्प पुन्हा थांबला. पेव्हिंग ब्लॉक बसवण्याचे काम काही प्रमाणात झाले असले तरी जॉगिंग ट्रॅक, पथदिवे, स्वच्छतागृह आणि ऐतिहासिक मन्रोयाचे नूतनीकरण यासारखी महत्त्वाची कामे अद्याप रखडली आहेत.
- कोट्यावधींचा चुराडा, तरीही अपूर्ण कामे
सुशोभीकरणाची सुरुवातच चुकीच्या पद्धतीने झाली. बफर झोनमध्ये 100 फुटी व्यासाचा चुकीचा एंन्टन्स प्लाझा उभारण्यात आला, बंध्रायाचे पिचिंग तीन वेळा करूनही अपूर्ण राहिले. यामुळे कोट्यावधी रुपये वाया गेले. मिनी कुस्ती मैदान, पक्षी निरीक्षण मनोरा, पथदिवे, संरक्षक भिंत आणि स्वच्छतागृह यांसारखी कामे तर झालीच नाहीत. आतापर्यंत फक्त अडीच किलोमीटरचा वॉकिंग ट्रॅक आणि चार हजार झाडे लावण्यापुरतेच सुशोभीकरण मर्यादित राहिले आहे.
- निविदा प्रक्रिया आणि निधीचा तुटवडा
डिसेंबर 2024 मध्ये काही कामांना सुरुवात झाली, पण पेव्हिंग ब्लॉक बसवण्यापलीकडे फारशी प्रगती नाही. थकीत बिलं, अपुरा निधी आणि नियोजनाचा अभाव ही प्रमुख कारणे आहेत. स्थानिक कंत्राटदारही नाराज आहेत. “काम करूनही बिले मिळत नाहीत, मग पुढे कसे काम करणार?“ असा सवाल ते उपस्थित करतात.
- पर्यटनाची संधी हातून निसटत आहे
कळंबा तलावाच्या सुशोभीकरणामुळे हा परिसर केवळ स्थानिकांसाठीच नव्हे, तर पर्यटकांसाठीही आकर्षण ठरू शकतो. यामुळे स्थानिक व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकते. मात्र, स्वच्छता, सुरक्षितता आणि सुविधांच्या अभावामुळे ही संधी हातून निसटत आहे. कळंबा कृती समिती, कळंबा तलाव संरक्षण समिती आणि कळंबा आंदोलन समिती यांनी वारंवार निवेदने देऊनही प्रशासन तटस्थ आहे. दरवेळी नवा निधी मंजूर होतो, पण परिणाम शून्य, अशी खंत तलावप्रेमी व्यक्त करतात.
- ऐतिहासिक वारसा जपण्याची गरज
राजर्षी शाहू महाराज यांच्या संकल्पनेतून साकारलेला कळंबा तलाव हा कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आहे. याचे संवर्धन आणि संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे. महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तलावाच्या तटबंदी, वृक्षारोपण आणि संरक्षणासाठी चर्चा केली आहे. कोल्हापूर शहर आणि आजूबाजूच्या गावांना लाभलेले हे वैभव जपून राजर्षी शाहू महाराजांचे कार्य पुढे न्यावे.
-संग्राम जाधव अध्यक्ष कळंबा तलाव संरक्षण व संवर्धन
- प्रशासनाने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा
ऐतिहासिक कळंबा तलावास गतवैभव प्राप्त व्हावे यासाठी दर्जेदार कामे सुरू आहेत. मात्र, निधीच्या अभावामुळे कामे रखडली आहेत. प्रशासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी माफक अपेक्षा आहे.
-गौरव सावंत, क्षत्रिय कन्स्ट्रक्शन








