नवी दिल्ली / वृत्तसंस्था
शास्त्रज्ञ नल्लाथांबी कलाईसेल्वी यांची वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यासोबतच त्यांच्याकडे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या (डीएसआयआर) सचिवपदाची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. आता त्या ‘सीएसआयआर’च्या पहिल्या महिला महासंचालक बनल्या आहेत. शेखर मांडे यांची जागा आता कलाईसेल्वी घेणार आहेत. मे महिन्यात शेखर मांडे यांच्या निवृत्तीनंतर जैवतंत्रज्ञान विभागाचे सचिव राजेश गोखले यांच्याकडे सीएसआयआरचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता.
देशातील 38 संशोधन संस्थांच्या कन्सोर्टियमच्या प्रमुखपदी नियुक्ती झालेल्या कलाईसेल्वी या पहिल्या महिला ठरल्या आहेत. त्यांनी ‘नॅशनल मिशन फॉर इलेक्ट्रिक मोबिलिटी’मध्येही महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या नावावर 125 हून अधिक शोधनिबंध आणि सहा पेटंट आहेत. कलाईसेल्वी यांच्या 25 वर्षांहून अधिक काळातील संशोधन कार्य प्रामुख्याने इलेक्ट्रोकेमिकल पॉवर सिस्टीम, विशेषतः इलेक्ट्रोड्सच्या विकासावर केंद्रित आहे. त्या सध्या सोडियम-आयर्न/लिथियम-सल्फर बॅटरी आणि सुपरकॅपेसिटरच्या विकासावर काम करत आहेत.
कलाईसेल्वी यांच्याकडे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन विभागाच्या सचिवपदाचाही कार्यभार असेल. त्यांची नियुक्ती दोन वर्षांच्या कालावधीसाठी आहे. त्यांनी ‘सीएसआयआर’मध्ये नोकरीला सुरुवात केल्यापासून संस्थेत चांगली प्रति÷ा निर्माण केली होती. फेब्रुवारी 2019 मध्ये त्या सीएसआयआर-सीईसीआयआरच्या प्रमुख महिला बनल्या होत्या. त्याच संस्थेत एंट्री-लेव्हल शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी संशोधनात आपली कारकीर्द सुरू केली. तामिळनाडूमधील तिरुनेलवेली जिह्यातील अंबासमुद्रम या छोटय़ाशा शहरातील कलाईसेल्वी यांनी आपले शालेय शिक्षण तामिळ माध्यमात केले. त्यानंतर महाविद्यालय पातळीवर विज्ञान शाखेतून शिक्षण घेतले होते.









