जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती : आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळादिन फेरीसाठी परवानगी देण्याकरिता अर्ज दाखल करण्यात आला आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत काळादिन फेरीला परवानगी दिली जाणार नाही, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. कर्नाटक राज्योत्सव तयारीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. राज्योत्सवकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीकडून काळादिन फेरीसाठी पोलीस खात्यासह जिल्हा प्रशासनाकडे अर्ज दाखल केला आहे. मात्र त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. परवानगी दिली जाणारही नाही. कायद्याचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. राज्योत्सवकाळात कोणतीच अनुचित घटना घडू नये यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्यादृष्टिने पोलीस प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. काळादिन फेरीमध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील तीन मंत्र्यांसह एक खासदार येणार असल्याची माहिती गुप्तचर खात्याकडून उपलब्ध झाली आहे. यावरून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्योत्सवादरम्यान काढल्या जाणाऱ्या काळ्यादिनाच्या फेरीत सदर नेत्यांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यांच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत.
याबाबत पोलीस खात्याला माहिती देण्यात आली असून आवश्यक ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रातील नेते काळादिन फेरीमध्ये सहभागी होत असतील तर त्यांना वेळीच रोखण्यात येईल. यासाठी पोलीस प्रशासन समर्थ असल्याचेही त्यांनी सांगितले. परवानगी नसतानाही काळादिन फेरी काढण्यात आल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असे पोलीस आयुक्त सिद्धरामप्पा यांनी सांगितले. गुप्तचर खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील चार नेते काळादिन फेरीत सहभागी होण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांना राज्याच्या सीमेबाहेरच रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांकडून तयारी करण्यात आली आहे. सीमावर्ती भागात 15 ठिकाणी चेकपोस्ट निर्माण केले आहेत. या चेकपोस्टवर पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख भीमाशंकर गुळेद यांनी दिली.









