चार खेळाडू युनिर्व्हसिटी ब्ल्यू किताबाचे मानकरी
बेळगाव : रामदुर्ग येथे सरकारी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिलांच्या खो-खो स्पर्धेत भाऊराव काकतकर महाविद्यालयाने सरकारी महाविद्यालय रामदुर्गचा पराभव करून विजेतेपद पटकावित आपली विजयी घौडदौड राखली आहे. रामदुर्ग येथे सरकारी महाविद्यालय आयोजित राणी चन्नम्मा विद्यापीठ महिलांच्या खो-खो उपांत्य फेरीच्या सामन्यात डीएमएसच्या भाऊराव काकतकर महाविद्यालयाने एसएसएमएस महाविद्यालय अथणी संघाचा 10-2 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात भाऊराव काकतकर संघाने सरकारी पदवीधर महाविद्यालय रामदुर्गचा 12-2 अशा गुण फरकाने पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. भाऊराव काकतकर महाविद्यालयाने गेली अनेक वर्षे आपली विजयी परंपरा राखत घौडदौड कायम ठेवली आहे. संघाची कर्णधार श्रेया मायाण्णाचे हिला उत्कृष्ट खेळाडूचा बहुमान देऊन गौरविण्यात आले. तिच्यासह 4 खेळाडूंना युनिव्हर्सिटी ब्ल्यू किताबाने गौरविण्यात आले. श्रेया मायाण्णाचे, ऋतुजा पाटील, वैष्णवी कुंभार, रक्षा होनगेकर यांनी युनिर्व्हसिटी ब्ल्यूचा मान मिळविला आहे. या चार खेळाडूंची साऊथ झोन आंतर विद्यापीठ खो-खो राष्ट्रीय स्पर्धेसाठी विद्यापीठ संघात निवड झाली आहे. विजयी संघाचा महाविद्यालयाचे प्रा. एस. एन. पाटील, व्ही.वाय. पाटील, क्रीडा निर्देशक सुरज पाटील यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.









