विविध वेशभूषेतील देखावे ठरले मुख्य आकर्षण : बलून-कबूतर आकाशात सोडून विजयोत्सवाचा शुभारंभ
वार्ताहर /काकती
राणी चन्नम्मांचा लढा तिच्या उत्सवातून जवळून समजावा म्हणून हा उत्सव प्रतिवर्षी साजरा करतो. तसे मुधोळातील दंड उत्सव. असे विविध उत्सव साजरे करताना रीती-रिवाज येतात. इतिहासातील लढे कोणी केले ते समजून घेऊन समाज घडविण्यासाठी परिकल्पना आहे. संत बसवण्णांची समानता, डॉ. आंबेडकरांचे आरक्षण, छत्रपती शाहूंची शिक्षण क्रांती आदी सामाजिक क्रांतीमुळे समाजाची सुधारणा होते, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी केले. काकती येथील राणी चन्नम्माच्या जन्मगावी राणी चन्नम्मा उत्सव 2023 अभूतपूर्व उत्साहात सोमवारी पार पडला. राचय्या महास्वामी व उदय स्वामी हिरेमठ यांचे सानिध्य यावेळी लाभले होते. कार्यक्रमाची सुरूवात प्रार्थना व नाडगीताने झाली. प्रांताधिकारी श्रवण नायक यांनी स्वागत केले. व्यासपीठावर आमदार असीफ सेट, जि. पं. कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, ग्रा. पं. उपाध्यक्ष रेणुका कोळी, तहसीलदार बसवराज नागराळ, माजी जि. पं. सदस्य सिद्दगौडा सुणगार, माजी ता. पं. सदस्य यल्लाप्पा कोळेकर, डॉ. एस. डी. पाटील, डॉ. अशोक स्वामी हिरेमठ, ग्रामविकास अधिकारी अरुण नाथबुवा उपस्थित होते. प्रमुख पाहुण्या वर्षा मुचंडीकर व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
किल्ला वनविभागाच्या अखत्यारीत असल्याने विकासकामात अडचणी
काकतीच्या विकासासाठी कोट्यांनी खर्च करीत आहोत. देसाई गल्लीतील राणी चन्नम्मा जन्मस्थानचा वाडा सरकारी पातळीवर यावर्षी खरेदी करायचा आहे. येथील किल्ल्यांचे संवर्धन करून विकास करायचा आहे. मात्र हा किल्ला वनविभागाच्या अखत्यारीत असल्याने अडचणी येत आहेत. तसेच काकतीच्या विकासाकरिता अनेक कामे हाती घेत आहोत, असे सांगून सर्वांना शुभेच्छा दिल्या. प्रमुख वक्ते डॉ. एच. बी. कोलकार यांचेही समयोचित भाषण झाले. व्यासपीठावरील मंत्री जारकीहोळीसह मान्यवरांचा सत्कार केला. कर्नाटक अलवू पत्रिकेच्यावतीने मंत्री जारकीहोळी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. बैलहोंगलहून वीरज्योत आणल्याबद्दल चन्नप्पा पुराणिकमठ यांचाही सत्कार केला.
शोभायात्रेत फुलांचा वर्षाव
सकाळी 9 वाजता मंत्री जारकीहोळी, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या हस्ते बलून व कबूतर आकाशात सोडून विजयोत्सवाचा शुभारंभ केला. गावच्या प्रवेशद्वारापासून मिरवणुकीच्या शोभायात्रेला सुरूवात झाली. मिरवणुकीत घोड्यावर बसलेली राणी चन्नम्मा, संगोळ्ळी रायण्णा, राजवाड्यातील दरबारी सेनापती या वेशभूषेतील देखावे आकर्षण ठरले. ‘यक्षगान’ हा नृत्यनाट्याचा अभिजात कलाप्रकार सर्वांचे लक्ष वेधीत होता. यासह समूह लोकसंगीत, तालवाद्य, झांझपथकासह चित्ररथ, डोक्यावर कुंभकलश घेऊन सुवासिनी सामील झाल्या होत्या. शोभायात्रेत युवा सुवासिनी फुलांचा वर्षाव करीत होत्या. राणी चन्नम्माच्या पुतळ्याचे पूजन करून मान्यवरांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. ता. पं. कार्यनिर्वाह अधिकारी राजेश जनवाडकर यांनी आभार मानले.
इतिहासातील लढे पाहून समाजात परिवर्तन करणे आवश्यक
आदर्श कोणाचा घ्यावा म्हणणाऱ्या समाजावर टिका करताना मंत्री जारकीहोळी पुढे म्हणाले, आजच्या समाजात सिनेमातील नट-नटी, क्रिकेटर आहेत. आणि टीव्हीत सासू-सुनांच्या मालिकेतील भांडणे पहायची आहेत. यामुळे सामाजिक सुधारणा होणार नाही. इतिहासातील लढे पाहून समाजात परिवर्तन करणे आवश्यक आहे.









