ग्रामस्थांची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : काकती ग्राम पंचायतीकडून कर दरात भरमसाट वाढ करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता सरकारच्या आदेशानुसार याची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे ग्राम पंचायतीकडून सांगण्यात येत आहे. मात्र ही करवाढ करून रहिवाशांवर अन्याय होत आहे. यासाठी कर दरात वाढ न करता पूर्वीप्रमाणे कर वसूल करण्यात यावा, अशी मागणी काकती ग्रामस्थांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांना देण्यात आले. ग्राम पंचायत क्षेत्रातील इमारती व बांधकामावर ग्राम पंचायत कर आकारणीबाबत नवीन कायद्यासाठी राज्य सरकारने हरकती मागविल्या होत्या.
याबाबत हरकती नोंद केल्या होत्या. 2023 पर्यंत रहिवाशांनी घरांसाठी व मोकळ्या जागांसाठी नेहमीप्रमाणे कर भरत होते. मात्र आता काकती ग्राम पंचायतीने आवाजवी कर लादला असून 2024-25 वर्षासाठी आवाजवी कर वसूल करण्यात येत आहे. कराच्या वसुलीचे आणि त्यामागील आधाराची माहिती जाणून घेण्याबाबत रहिवाशी वारंवार विचारणा करत होते. मात्र याकडे पंचायत प्रशासन कानाडोळा करत आवाजवी कर वसूल करत आहे. आवाजवी कर वाढविण्यात आल्यामुळे नागरिकांवर आर्थिक संकट आले असून त्यांच्यावर अन्याय होत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करून वाढविण्यात आलेल्या कराबाबत ग्राम पंचायत प्रशासनाकडे विचारणा करावी. त्याचबरोबर लवकरात लवकर आवाजवी वाढविण्यात आलेला कर कमी करण्याची मागणी रहिवाशांतून होत आहे.









