वृत्तसंस्था / नवी दिल्ली
यावर्षीपासून कैलास-मानसरोवर यात्रेचा पुन्हा प्रारंभ होणार आहे. या संबंधात चीनने मान्यता दिली असून भारत आणि चीन यांच्यातील चर्चेत या विषयावर चर्चा झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी या संबंधीचा निर्णय घेतला. कैलास-मानसरोवर हे भारतातील आणि जगभरातील हिंदूंचे महत्वाचे तीर्थस्थळ आहे. हा निर्णय भारताच्या परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिस्री यांच्या चीनी अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर घेण्यात आला. ही चर्चा रविवारी झाली होती. या निर्णयाची घोषणा भारत आणि चीन यांच्या उच्च अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या केली आहे. गेली तीन वर्षे लडाख सीमेवर दोन्ही देशांमध्ये संघर्ष आणि तणाव निर्माण झाल्यामुळे ही यात्रा झाली नव्हती. 2025 मध्ये तिचा पूर्ववत प्रारंभ होणार आहे.
प्रक्रियाही होणार घोषित
कैलास-मानसरोवर यात्रेसंबंधीचे नियम आणि प्रक्रिया यांची घोषणा लवकरच केली जाणार आहे. यात्रेकरुंची संख्या आणि त्यांनी पाळावयाचे नियम याविषयीही माहिती दिली जाणार आहे. पूर्वी यासंबंधी जे नियम होते, त्यांचाच आधार यावर्षीचे नियम बनवितानाही घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.









