केंद्र सरकारकडून घोषणा :5 वर्षांच्या कालावधीनंतर आयोजन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
30 जूनपासून कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने शनिवारी केली आहे. ही यात्रा 5 वर्षांच्या कालावधीनंतर सुरू होत अहे. भारत आणि चीनकडून संबंध सुधारण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.
कैलास मानसरोवर यात्रा 30 जून ते ऑगस्टपर्यंत होणार आहे. यंदा 5 तुकड्या असतील, यातील प्रत्येक तुकडीत 50 भाविक सामील असतील, या तुकड्या उत्तराखंडमधून लिपुलेख खिंडीला पार करत यात्रा करणार आहेत. तर प्रत्येकी 50 भाविक असलेल्या 10 तुकड्या सिक्कीममधून नाथू ला खिंडीला पार करत यात्रा करणार आहेत. यात्रेसाठी अर्ज करण्यासाठी वेबसाइट उपलब्ध करण्यात आली आहे. अर्जदारांमधून यात्रेकरूंची निवड निष्पक्ष, संगणकाने तयार, रँडम पद्धतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
कैलास मानसरोवर यात्रेचे संचालन आणि राज्य सरकार आणि विदेश मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नाने केले जाणार आहे. कैलास मानसरोवर यात्रा 2020 पासून संचालित होऊ शकली नव्हती. यंदा भाविकांना कुमाऊं मंडळ विकास निगमला (केएमव्हीएन) 35 हजाराच्या जागली 56 हजार रुपयांचे शुल्क द्यावे लागणार आहे.
केएमव्हीएन या निधीतून भाविकांच्या ये-जा, वास्तव्य आणि भोजनाची व्यवस्था करणार आहे. याचबरोबर भाविकांना अन्य खर्च करावे लागणार आहेत. कुमाऊं मंडळ विकास निगम लिपुलेख खिंड मार्गे कैलास मानसरोवर यात्रेचे व्यवस्थापन हाताळते. यावेळी नोंदणीसोबत भाविकांना भोजन, प्रवास आणि वास्तव्यासाठी केएमव्हीएनला 56 हजार रुपये द्यावे लागणार आहेत.
प्रत्येक तुकडीची 22 दिवसांची यात्रा
उत्तराखंडच्या वतीने कैलास मानसरोवर यात्रेचे संचालन कुमाऊं मंडळ विकास निगम करणार आहे. ही यात्रा दिल्लीतून सुरू होत पिथौरागडच्या लिपुलेख खिंड मार्गाने संचालित केली जाईल. पहिली तुकडी 10 जुलै रोजी लिपुलेख खिंडीतून चीनमध्ये प्रवेश करणार आहे. अंतिम तुकडी 22 ऑगस्ट रोजी चीनमधून भारतासाठी प्रस्थान करणार आहे. प्रत्येक तुकडी 22 दिवसांची यात्रा करणार आहे.









