उत्तराखंडमध्ये मिळाला ह्यू पॉइंट : पवित्र पर्वत तेथून 50 किमी अंतरावर
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
हिंदू धर्मियांसाठीचे पवित्र तीर्थस्थळ कैलास पर्वताचे दर्शन आता भारतातूनही होऊ शकणार आहे. याकरता आता चीनव्याप्त तिबेटमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. उत्तराखंडच्या पिथौरागड जिल्ह्यातील 18 हजार फूट उंच लिपुलेख पर्वतरांगांमधून कैलास पर्वत स्पष्टपणे दिसून येतो. तसेच येथून कैलासाचे हवाई अंतर 50 किलोमीटर इतके आहे. या नव्या दर्शनमार्गाचा शोध स्थानिक ग्रामस्थांनी लावला आहे. ग्रामस्थांकडून मिळालेल्या माहितीनंतर तेथे पोहोचलेल्या अधिकारी अन् तज्ञांच्या पथकाने रोड मॅप, लोकांच्या वास्तव्याची व्यवस्था, दर्शन पॉइंटपर्यंत जाण्याच्या मार्गासह अन्य व्यवस्थांसाठी पाहणी केली आहे. या पथकाकडून आता स्वत:चा अहवाल पर्यटन मंत्रालयाला सोपविण्यात येणार आहे. यानंतर या नव्या दर्शन पॉइंटवर काम सुरू होईल. तज्ञ पथकात सामील कृति चंद यांनी लिपुलेखच्या ज्या पर्वतावरून कैलास दिसतो, तो नाभीढांगपासून 2 किलोमीटर उंचीवर असल्याचे सांगितले आहे. नाभीढांग येथून 4-5 दिवसांचा प्रवास करत कैलास पर्वताचे दर्शन घेतले जाऊ शकते. भाविकांना रस्तेमार्गाद्वारे धारचूला आणि बूढीमार्गे नाभीढांगपर्यंत पोहोचावे लागेल. यानंतर दोन किलोमीटरचे अंतर पायी पूर्ण करावे लागणार आहे. ओल्ड लिपुलेख येथे पोहोचण्यासाठी 2 किलोमीटरची चढाई करावी लागते, जे सोपे नाही. तिथपर्यंत पोहोचण्यासाठी मार्ग देखील तयार केला जाऊ शकतो. स्नो स्कूटरच्या मदतीने देखील भाविकांना दर्शनसाठी पर्वताच्या शिखरापर्यंत पोहोचविले जाऊ शकते असे पर्यटन विभागाचे सांगणे आहे.
लिंपियाधुरा शिखरावरूनही दर्शन
पिथौरागढच्या ज्योलिंगकांग येथून 25 किलोमीटरवरील लिंपियाधूरा शिखरावरूनही कैलास पर्वताचे दर्शन होऊ शकते असा स्थानिक लोकांचा दावा आहे. लिंपियाधूरा शिखरानजीक ओम पर्वत, आदि कैलास आणि पार्वती सरोवर आहे. तेथून कैलास पर्वताचे दर्शन घडल्यास या क्षेत्रात धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार आहे.
यात्रेकरता लागतात 2-3 आठवडे
कैलास यात्रा 3 वेगवेगळ्या मार्गांनी होते. लिपुलेख खिंड (उत्तराखंड), नाथू खिंड (सिक्कीम) आणि काठमांडू मार्गे ही यात्रा होते. या तिन्ही मार्गांवर कमीतकमी 14 तर कमाल 21 दिवसांचा कालावधी लागतो. 2019 मध्ये 31 हजार भारतीयांनी कैलासाचे दर्शन घेतले होते.









