अध्याय चोविसावा
माणसाचा पुनर्जन्म त्याच्या मागील जन्मातील अपुऱया राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी होत असतो हे लक्षात घेऊन जो मनुष्य निरिच्छ होऊन जीवन जगेल तो या त्रैलोक्मयाच्या म्हणजे स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ लोकाच्या पलीकडे जाऊ शकतो हे उद्धवाला समजावून दिल्यानंतर भगवंत त्रैलोक्मयाच्या पलीकडे असलेल्या लोकांबद्दल माहिती देत आहेत. ते म्हणाले, ह्या त्रैलोक्मयाच्या बाहेर एक लक्ष योजने अंतरावर भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या कृपेने ध्रुवमंडळ निर्माण केले आहे.
त्रैलोक्मयात प्रलयकाळ झाला तरी ध्रुवाला कधीही स्थान सोडावे लागत नाही. पृथ्वीपासून एक कोटी योजने अंतरावर महर्लोक आहे तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणारे लोक राहतात. तेथून वर एक कोटी योजनेअंतरावर जनोलोक आहे. तेथे जितेंद्रिय व महायोगी असे सनकादिक राहातात. तेथून पुढे दोन कोटी योजने अंतरावर तपोलोक आहे. तपस्वी वैराजदेव हेच तेथील रहिवासी होत. तपोलोकाहून वर चार कोटी योजनेवर सत्यलोक आहे. तेथील अधिपती ब्रह्मदेव आहेत. तेथे चारही वेद, शुद्ध ब्रह्मचर्य, तप, गायत्री, वाणी, दया, योग, दक्षिणाग्नि, गार्हपत्य व आहवनीय असे तीन अग्नी, मूर्तीरूपाने हजर असतात. तेथे गायत्रीमंत्राचा जप करणारे, वेदशास्त्रसंपन्न ब्राह्मणांचा आदर करणारे आणि जे यज्ञयागांचे निष्काम उपासक असे लोक राहतात. सत्यलोकापर्यंत पोहोचणारे लोक ब्राह्मणांच्या कार्याकरिता मृत्यु पत्करणारे, गोरक्षणाकरिता प्राण देणारे, परोपकार करता करता स्वतः दरिद्री होणारे असतात.
थोडक्मयात संपूर्ण निस्वार्थतेनं सत्कर्मात आयुष्य घालवणारे लोक सत्यलोकात राहतात असं म्हणता येईल. जे दुसऱयाची निंदा करण्यासाठी कधीही तोंड उघडत नाहीत, परस्त्रीकडे ढुंकूनही बघत नाहीत. परद्रव्यापासून जे पराङ्मुख असतात अशानाच सत्यलोकात स्थान मिळते. तेथला अधिपती ब्रह्मदेव होय. उद्धवा! ब्रह्मदेवाच्या सृष्टिची मर्यादा इथपर्यंतच आहे हे लक्षात ठेव. म्हणजेच ब्रह्मदेवाच्या सृष्टीनिर्मितीमध्ये आत्तापर्यंत सांगितलेल्या निरनिराळय़ा लोकांचा समावेश होतो. आता या सृष्टीव्यतिरिक्त असलेल्या इतर लोकांविषयी मी तुला माहिती देतो. भोळय़ा शंकराने ब्रह्मांडाहून वेगळा असा कैलास निर्माण केला आहे आणि मेघश्याम विष्णूने वैकुंठ निर्माण केले आहे. हे लोक त्यांनी आपापल्या लीलांनी तयार केले आहेत. ब्रह्मांडाची निर्मिती अथवा त्याचा प्रलय झाला तरी वैकुंठ आणि कैलास ह्यांना धक्का लागत नाही. तेथील राहण्याची विलक्षण गोडी विष्णुभक्त आणि शंकरभक्त हेच खरोखर जाणतात. तेथील वैशिष्टय़े ऐक.
तेथे काळाचा प्रवेशही होत नाही, कर्माचे कर्मबंधन नाही, तेथे जन्ममरण नाही. अनन्यभक्त असतील त्यांनाच हे स्थळ प्राप्त होते. वैकुंठ आणि कैलास यांची रचना सांगावयास लागले म्हणजे मनाचा मी आणि माझेपणा नाहीसा होतो.
हे बुद्धिमान् उद्धवा! आता तेथील लोकांची लक्षणे सांगतो ऐक. सर्व जीवांना सुखदायक, जो पार्वतीचा परमेश्वर, जो योग्यांचा योगेश्वर, असा तो शंकर कैलासात राहतो. तो जटा धारण करणारा, मस्तकावर गंगा वाहणारा, पिनाक नांवाचे धनुष्य हातात असणारा, पंचमुखी, कापूर किंवा गाईचे दूध ह्यांच्यासारख्या पांढऱया शुभ्र वर्णाचा, आपल्या भक्तांना सदोदित अभय देणारा व वरदायक, अकार, उकार व मकार या तीन मात्रांच्या पलीकडचा, त्रैलोक्मयाचा नेत्र, त्रिपुराचा नाश करणारा, त्रिविध तापांचा उच्छेद करणारा आणि तिन्ही लोकांना सुखी करणारा असा
आहे.
नागभूषणे धारण केल्यामुळे ज्याची शोभा विशेष खुलते, ज्याने रुद्राक्ष व रुंडमाळा धारण केल्या आहेत, ज्याचा कंठ नीलरत्नासारखा आहे. भस्मलेपनाने ज्याचे अंग धुरासारखे दिसते, त्रिशूळ आणि डमरू ज्याने हातात घेतले आहेत ज्याला तीन नेत्र आहेत, त्याने व्याघ्रांबर हेच वस्त्र अंगावर घेतले आहे, रामनामजपामध्येच जो आपल्या हातातील जपमाळा नेहमी तत्पर ठेवितो. त्याचे कितीही वर्णन केले तरी कमीच असल्याने ते करणारा कधीही थकत नाही.
क्रमशः








