कोल्हापूर :
मंगळवार पेठेतील कैलासगडची स्वारी मंदिराची स्थापना 1960 साली परिसरातील नागरिकांनी केली. या मंदिरात श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी विशेष पूजा बांधली जाते. पहाटे पाच वाजता विधीवत पूजा झाल्यानंतर नागरिकांना दर्शनासाठी मंदिर खुले केले जाते. श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी सत्यनारायण पूजा घालून तिर्थप्रसादाचे वाटप केले जाते. सोमवारी दिवसभर दर्शनासाठी भाविकांची गर्दी असते.
कैलासगडची स्वारी मंदिराचे बांधकाम जोतिबा डोंगरावरील घडवलेल्या काळ्या पाषाणात केले आहे. 1960 साली श्रीपतराव विचारे, शंकरराव थोरात, कृष्णाजी जाधव, रामचंद्र जाधव, यांच्यासह अन्य नागरिकांनी मंदिराच्या स्थापनेची जबाबदारी स्विकारली होती. मंदिराच्या गाभाऱ्यातील चौथाऱ्यात शिवलिंग, नंदी, भवानीमाता, त्रिशुळ, राजदंड, पिराची काठी आहे. या मंदिरातील महादेवाच्या पिंडीला दुग्धाभिषेक, फलाभिषेक घातला जातो. त्यानंतर आरती आणि प्रसाद वाटप होते. रात्री 8 वाजता आरती झाल्यानंतर शिवालय भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होतो. त्यानंतर सकाळी 10.30 ला मंदिर बंद केले जाते.
कैलासगडची स्वारी मंदिरात शिवजयंती सोहळा मोठया उत्साहात साजरा केला जातो. या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांचे कलायोगी जी. कांबळे यांनी रेखाटलेले तैलचित्र मंदिराचे मुख्य आकर्षण मानले जाते. तसेच शिवराज्याभिषेक, महाभारतातील कृष्णाचे विराट स्वरूप, शंकर, सरस्वती, गणपती पोस्टर, रायगड समाधी पोस्टर मंदिरात आहेत. 1972 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराला भव्य आकर्षक प्रवेशव्दार आहे.
- होळी पौर्णिमेला वर्धापण दिन
कैलासगडची स्वारी मंदिराचा वर्धापण दिन होळी पौर्णिमेच्या दिवशी असतो. वर्धापन दिनी महादेवाच्या पिंडीला रूद्राभिषेक घातला जातो. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम होतो. तर दुसऱ्या दिवशी सत्यनारायण पूजा, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिक, पालखी सोहळा असतो. पालखीने मंदिरात प्रस्थान केल्यावर आरती होते. त्यानंतर खासबाग चौकात महाप्रसादाचे वाटप केले जाते.
- मंदिराचे वैशिष्ट्य
ऐतिहासिक, पौराणिक आणि आधुनिक कलेचा त्रिवेणी संगम म्हणावा लागेल. मंदिर उभारताना ज्योतिबा डोंगर येथील काळा पाषाण वापरून कलाकुसर केलेली आहे. मंदिरासमोरील एक टन वजनाचा पितळी नंदी व मंदिराच्या दोन्ही बाजूचे दीड टन वजनाचे व 22 फूट उंचीचे पितळी दीपस्तंब आकर्षक आहेत.








