सातारा :
श्री बालाजी ट्रस्ट साताराच्या माध्यमातून आणि लोकसहभागातून संगममाहुली येथे उभारलेल्या कैलास स्मशानभूमीचे संपूर्ण व्यवस्थापन गेली 22 वर्ष म्हणजे 8030 दिवस एकही दिवस बंद न ठेवता कोरोना काळात सुध्दा दहा पटीने अंत्यसंस्काराचे काम वाढले असताना, सर्व जग बंद असताना सातत्याने विनातक्रार सेवा आणि कर्तव्यभावनेने सुरू आहे. यासाठी नागरिक सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य करीत आहेत त्याबद्दल धन्यवाद. मात्र, स्मशानभूमीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी रात्री 10 ते सकाळी 7 या दरम्यान अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी बंद ठेवण्यात येईल अशी माहिती बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी दिली.
राजेंद्र चोरगे म्हणाले, कैलास स्मशानभूमी सुरु झाल्यापासून आजपर्यत 22 वर्षात कधीही बंद ठेवली नव्हती. अविरतपणे सेवा दिली गेली आहे. परंतु ही सेवा देणाऱ्या कैलास स्मशानभूमीमध्ये एकूण 7 कामगार असून ते अत्यंत प्रामाणिकपणे स्मशानभूमीची देखभाल आणि स्वच्छता ठेवत असतात. स्मशानभूमीसारख्या ठिकाणी कामगार मिळणे आणि ते टिकवणे फार अवघड असते, तसेच या प्रकारची कामे करणाऱ्या व्यक्तींची संख्या फारच कमी असते, एखादा कामगार सोडून गेला तर दुसरा कामगार मिळणे अशक्य होत असते. अशा वेळी आहे त्या कर्मचारी यांची सर्वबाजूने फार काळजी घेऊन त्यांना टिकवून ठेवणे अवघड असते. अश्या या दुर्मिळ सेवकांची मानसिकता सांभाळणे आमच्या संचालकांबरोबर सर्व नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे. यासाठी श्री बालाजी ट्रस्टने सर्वबाजूने विचार करूनच काही नियम आणि अटी कैलास स्मशानभूमीसाठी निश्चित केल्या आहेत व त्याप्रमाणे स्मशानभूमीत सूचना फलक सुध्दा लावण्यात आले आहेत. या सूचना प्रमाणे सर्वच नागरिक सहकार्य चांगले करत आहेत, म्हणूनच आपली कैलास स्मशानभूमीमध्ये चांगली शिस्त आणि नियमाचे पालन केले जात आहे. कैलास स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्याची वेळ ही रोज सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत असते. आणि रात्री साठी 2 कर्मचारी सेवेसाठी असतात. अंत्यसंस्कार ची शेवटची वेळ ही रात्री 10 पर्यंत ची असते कारण ज्या वेळी रात्री 10 वाजता अंत्यसंस्कारासाठी मृत व्यक्तीला आणले जाते. त्यानंतर संपूर्ण अंत्यसंस्कार विधी होण्यासाठी रात्रीचे 11 ते 11:30 वाजतात. आणि त्यानंतर कर्मचारी सेवक घरी जातात, अंघोळ करून जेवण करतात म्हणजे रोजचे त्यांना रात्रीचे 12 वाजतात झोपायला. त्यात त्या दोन्ही कर्मचारी सेवकांच्या घरी त्यांची बायको, आईवडील, लहान मुले आहेत. त्यामुळे त्यांच्या घरच्या लोकांना काय त्रास होत असेल याची जाणीव आपण सर्वांनी केली पाहिजे. एवढे सर्व आपल्याला सांगायचे कारण म्हणजे प्रत्येक महिन्याच्या 30 दिवसात 7 ते 8 वेळा अंत्यसंस्कारसाठी आम्हाला नागरिकांचे फोन येतात आणि रात्रीच आम्हाला अंत्यसंस्कार करायचे आहे. पण 1,2 तास उशीर लागेल असे सांगून स्मशानभूमीचा वेळ वाढवून मागतात. रोजच्याच व्यस्त दिनचर्येमुळे वेळ वाढवून दिल्यावर कर्मचारी सेवकांच्या दैनंदिन जीवनात त्रास होत असतो आणि वेळ वाढवून नाही दिली तर अशा भावनिक परिस्थितीमध्ये गैरसमज होणे, वाद होणे, कर्मचाऱ्यांना दमदाटी किंवा शिवीगाळ होणे याचे प्रमाण वाढत आहे. तसेच आजपर्यंतच्या अनुभवाप्रमाणे रात्री उशिरा अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या काही लोकांच्या तोंडात गुटखा आणि तंबाखू असते ते रात्री कर्मचारी सेवकांना दिसत नाही, ओघाने नजर चुकवून गुटखा खाणारे पवित्र स्मशानभूमीत कोठेही थुंकत असतात आणि तेच आमच्या सेवकांना सकाळी हाताने धुवावे लागते. अंत्यसंस्कारासाठी कोणालाही कसलाही त्रास होऊ नये असे आम्हाला वाटते आणि त्या प्रमाणे श्री बालाजी ट्रस्ट आणि कर्मचारी सेवक कायम कर्तव्य भावनेतून काम करीत असतात. परंतु कर्मचारी सेवक यांना ज्यादा वेळेचा त्रास होऊ नये म्हणून वेळेचे बंधन असणे आवश्यक आहे. कैलास स्मशानभूमी सारख्या जिव्हाळ्याच्या आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त आणि नियमांचे पालन करणे आपले सर्वांचेच कर्तव्य आहे, असे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे राजेंद्र चोरगे, संजय कदम, जगदिश खंडेलवाल, नितीन माने, अंबाजी देसाई, उदय गुजर, हरिदास साळुंखे, दीपक मेथा, संतोष शेंडे, जगदीप शिंदे यांनी केले आहे.








