रणजित जाधव यांच्या हस्ते उद्घाटनाच्या कुस्तीने प्रारंभ
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शाहु क्रीडा संकुलात ऑलिम्पिक विजेते स्व. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ गुरुवारी सकाळी करण्यात आला. उद्घाटनाची कुस्ती ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव विकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजित जाधव यांच्या हस्ते लावण्यात आली. 40 किलो वजनी गटातील पहिलीच उद्घाटनाची कुस्तीत फलटणच्या साजन घनवटला सातारच्या शिवराज मानेने गुणावर अस्मान दाखवले. शिवराज मानेचा भगवा फेटा घालून सत्कार करण्यात आला.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्यावतीने कै. खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेचे उद्घाटन सोहळय़ाला यावेळी प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, उपशिक्षणाधिकारी धनंजय चोपडे, विस्तार अधिकारी विशाल कुमठेकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक तालुक्यातून वजनी गटातून मल्ल या स्पर्धेसाठी आले होते.
उद्घाटनावेळी रणाजित जाधव म्हणाले, कुस्ती हा खेळ कसरतीचा, कौशल्याचा आणि हुशारीपणाचा खेळ आहे. या खेळात मल्लाच्या अंगी चपळपणा, डोक्यामध्ये तलखपणा असणे गरजेचे असते. डाव टाकल्यावर त्या डावातून निसटून प्रतिडाव टाकून गुणावर कशी मात करायची आणि कुस्ती आपण कशी जिंकायची हा एक खेळ आहे. मन, मेंदू आणि मनगट या तिन्हींचा संगम या खेळात आहे, असे त्यांनी सांगितले.
उद्घाटनाची कुस्ती सातारच्या शिवराज माने आणि फलटणच्या साजन घनवट यांच्यात 40 किलो वजनी गटात लावली गेली. साजन उंचीने सडपातळ तर शिवराज कमी उंचीचा आखुड बांध्याचा मल्ल. सुरुवातीपासूनच साजनवर शिवराजने चढाई केली. वेळेत गुणांची बेरीज मिळवत 10 गुण जमा केले. तर साजनला एक गुण मिळवता आला नाही. 10 गुणांनी त्याला पंचांनी विजयी केले. त्याच बरोबरच त्यानंतरची कुस्तीत आयुष्य मदने हा वजनात बाद झाला त्यामुळे खंडाळय़ाच्या गणेशला विजयी घोषित करण्यात आले. त्याचबरोबर चटकदार अशा कुस्त्या पार पडल्या.








