बेळगाव : केएलई अॅकॅडमी हायर एज्युकेशन अँड रिसर्चचे समुपदेशन केंद्र व मानसोपचार विभाग यांच्यावतीने कणकुंबी येथे गर्भवती महिलांसाठी मानसिक आरोग्य कसे जपावे? याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. कणकुंबी प्राथमिक आरोग्य आणि युनायटेड सोशल वेल्फेअर सोसायटी यांच्या सहकार्याने झालेल्या या कार्यशाळेत कणकुंबीसह खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील 30 हून अधिक खेड्यातील गर्भवती महिलांनी भाग घेतला. तालुका आरोग्याधिकारी डॉ. किवडसण्णावर यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.
काहेरच्या मानसोपचार तज्ञ डॉ. यास्मीन यांनी मानसिक आरोग्य कसे जपावे? अस्वस्थता, नैराश्य, एकटेपणा यांना कसे सामोरे जावे? व त्याचे निवारण कसे करावे? याबाबत मार्गदर्शन केले. गर्भवती महिलांबरोबरच आशा कार्यकर्त्या, आरोग्यसेवक व गर्भवती महिलांच्या कुटुंबीयांनासुद्धा मार्गदर्शन करण्यात आले. सर्व सहभागींना मानसिक आरोग्य कसे जपावे? याबद्दल मार्गदर्शन करणारी पत्रके वितरित करण्यात आली.
याच कार्यक्रमात आरती संकेश्वरी यांनी मानसिक आरोग्य व शरीरस्वास्थ्य यासाठी योगसाधना व ध्यानधारणा किती महत्त्वाची आहे? हे सांगून त्याचे प्रात्यक्षिक दाखविले. जिल्हा मानसिक आरोग्य प्रकल्प अधिकारी डॉ. गीता कांबळे यांनी गर्भवतींच्या स्वास्थ्याच्या हेतूने अशा शिबिरांची आज नितांत गरज असल्याचे सांगितले. यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पटेल आणि बी. टी. चेतन व त्यांचे सहकारी उपस्थित होते.









