कागल विधानसभा युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांनी घेतली भेट; पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबतची खदखद केली व्यक्त
कोल्हापूर
आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आणायचे आहे. त्यामुळे 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोणी दगाफटका केला, मतदार संघात कोण डावलतंय यावरुन कोणताही वेगळा विचार न करता महायुतीसाठीच काम करायच आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याचाच प्रामाणिक प्रचार करा, असा आदेश खासदार धनंजय महाडिक यांनी कागल विधानसभा मतदार संघातील धनंजय महाडिक युवाशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिला.
कागल विधानसभा मतदार संघातील युवाशक्तीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी रविवारी संपर्क कार्यालयात खासदार महाडिक यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या मेळाव्यामध्ये कार्यकर्त्यांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या तक्रारींचा पाढा वाचला.
याप्रसंगी बोलताना बाळ पोटे-पाटील, 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळूनही कोणी दगाफटका केला हे सर्वश्रुत आहे. तरीही विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ यांचा प्रचार केला. त्यांच्या विजयामध्ये युवाशक्तीचा मोलाचा वाटा आहे. पण त्यांच्याकडून नेहमीच कार्यकर्त्यांना डावलले गेले. ज्यांनी 2019 ला दगाफटका केला, त्यांच काय करायचा सांगा, अशी विचारण कार्यकर्त्यांच्यावतीने पोटे-पाटील यांनी केली.
यावर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, युवाशक्तीच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. यापुर्वीच्या निवडणुकीत काय झाले याचा विचार करु नका. भाजप पक्षाने राज्यसभेचा खासदार करुन महाडिक गटाला मोठी ताकद दिली आहे. त्यामुळे महायुतीसाठीच काम करायचं आहे, अशी सूचना खासदार महाडिक यांनी केली. यावेळी सागर देसाई, विजय फुटाणे, शिवाजी मगदूम, समीर चाँद, सागर गंधवाले, स्वप्निल पाटील, विजय लोकरे यांनीही खासदार महाडिक यांच्यासमोर खदखद व्यक्त केली.
धनंजय महाडिक हिमालयाप्रमाणे पाठीशी
विधानसभा मतदार संघात कोण डावलतयं याची चिंता करु नका. तुमचा खासदार हिमालयाप्रमाणे तुमच्या पाठीशी आहे. कोणत्याही कामासाठी कोणाकडून अपेक्षा न ठेवता माझ्याकडे या, असे आवाहन खासदार महाडिक यांनी केले.
इमेज सुधारण्यासाठी खासदारांच्या फोटोचा आधार
माजी पालकमंत्री द्वेषाने बोलत असले तरी संयम ठेवा. माजी पालकमंत्र्यांनी जिल्ह्याचे राजकारण मलीन केले. त्यांची इमेज खराब झाली आहे. त्यामुळे गणेशोत्सवामध्ये उभारलेल्या फलकांमध्ये खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांचा फोटो वापरुन ते आपली इमेज सुधारण्याचा प्रयत्न करत असल्याची टिका खासदार महाडिक यांनी केली.
महाडिक गटाला विचारात घ्यायला लावू
कार्यकर्त्यांनी घेतलेल्या भेटीमुळे त्यांची खदखद समजली. मी कुठे चुकतो आहे हेही समजले. त्यामुळे आता तालुकावार मेळावे घेवून कार्यकर्त्यांची बाजू समजून घेतली पाहिजे. तसेच पुढील काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या राजकारणात प्रत्येक तालुक्यात महाडिक गटाला विचारात घेतले जाईल, असा शब्द खासदार महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिला.