कागल / प्रतिनिधी
Kolhapur Breaking News : कागल तालुक्यातील सिध्दनेर्ली येथील नदी किनाराजवळ दुधगंगा नदी पात्रात चार मानवी कवटया आढळल्या. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. कागल पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन. त्या कवट्या ताब्यात घेतल्या.
याबाबत अधिक माहिती अशी, सिध्दनेर्ली पैकी नदीकिनारा येथे दुधगंगा नदीपात्रात सकाळी अनेक लोक पोहण्यासाठी, जनावरे धुण्यसाठी जातात. आज नियमित पोहण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला पात्रातील पाणी कमी झाल्याने कवटी दिसून आली. याबाबत तात्काळ त्यांनी पोलीस पाटील उध्दव पोतदार यांना माहिती दिली. पोलिस पाटलांनी कागल पोलिसांना याबाबत माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच कागल पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत त्या कवट्या ताब्यात घेतल्या.
सदर चार मानवी कवटी एकाच परिसरात सापडल्याने चर्चेला उधाण आले आहे. या व्यक्ती कोण? नेमका हा प्रकार कधी घडला? उर्वरित देह कुठे टाकला ? यांची उत्तरे तपासाअंतीच समोर येणार आहेत. दरम्यान, या भागात अघोरी विदया करणारे काही भोंदु असल्याने त्यांनी अघोरी प्रकारासाठी या कवट्या वापरलेल्या आहेत का? असे प्रश्नही उपस्थित होत आहेत.










