कोल्हापूर :
प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरच्या कार्यक्षेत्रातील कागल येथे महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट नेटवर्क लिमिटेड या शासन नियुक्त सेवापुरवठादाराकडून आधुनिक व संगणकीकृत सीमा तपासणी नाका मंगळवारी पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आला . हा नाका मुंबईतील परिवहन विभागाच्या कार्यालयाशी इंटरनेटव्दारा जोडण्यात आला आहे . लॉरी असोसिएशनचा विरोध व विविध अडथळे पार करत अखेर हा नाका सहा वर्षांनंतर सुरू करण्यात आला .
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, महाराष्ट्र बॉर्डर चेक पोस्ट कंपनीचे व्यवस्थापक संतोष कुमार, शैलेश शुक्ला, रितेश पाटील, निलेश भोसले तसेच उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर, कागलचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या उपस्थितीत हा नाका सुरू करण्यात आला. महामार्गावरून येणारी वाहने या नाक्याकडे वळविण्यात येत होती.
2013 साली जमीन संपादनाची पूर्तता करून नाक्याच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. डिसेंबर 2018 मध्ये नाक्याचे संपूर्ण काम पूर्ण करण्यात आले. महामार्गाच्या दोन्ही बाजूला लहान, मध्यम आणि अवजड वाहनांसाठी 10 लेन तयार करण्यात आली आहेत. पहिल्या तीन लेन मोटरसायकल रिक्षा आणि कार या वाहनांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. चार ते दहा क्रमांकाच्या लेनमधून 60, 100 आणि 150 मेट्रीक टन मालाची वाहतूक करणारी वाहने जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी दोन्ही बाजूला प्रत्येकी सात वेब्रीज बसविण्यात आली आहेत. या नाक्यातील सर्वच कामकाज सीसीटीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यामातून मुंबईतील परिवहन अणि उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयाशी जोडण्यात आले आहे.
खासगी तत्वावर चालवला जाणारा हा नाका सुरू करण्याला कोल्हापूर जिल्हा लॉरी ऑपरेटर असोसिएशनचा मोठा विरोध आहे. तसेच शेतक्रयांचा ही विरोध होता . गेली 4 वर्षे हा नाका विविध कारणांनी वादात सापडला होता. या आधुनिक सीमा तपासणी नाक्यांवर विहीत केलेल्या तरतुदीनुसार सेवा कर व उपकर वसूल करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार हा नाका अखेर सुरू करण्यात आला . या तपासणी नाक्याचे काम तीन शिफ्टमधे चालवले जाणार आहे .
वाहनांसाठी आकारण्यात येणारे शुल्क
हलकी व्यावसायिक वाहने – 53 रुपये 10 पैसे
मध्यम व्यावसायिक वाहने – 112 रुपये 10 पैसे
जड, अतिजड व्यावसायिक वाहने – 218 रुपये 30 पैसे








